अभोण्यात आठवडाभर जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:46 IST2020-07-06T18:45:51+5:302020-07-06T18:46:12+5:30
अभोणा : शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अभोणा ग्रामपालिका प्रशासनासह व्यापारी संघटनेने दि. ६ ते १२ जुलैपर्यंत संपूर्ण शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.या कालावधित फक्त वैद्यकीय सेवा व औषधांची दुकाने सुरु असणार असून अन्य सर्व व्यावसायिक दुकाने पूर्णत: बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपालिका प्रशासक एस. डी. महाले यांनी दिली.

अभोण्यात आठवडाभर जनता कर्फ्यू
दरम्यान, अभोण्यासह सप्तशृंग गडावर कोरोना बाधित आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी कळवणचे तहसिलदार बंडू कापसे, पोलीस उपअधिक्षक शांताराम वाघमारे, कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देत व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर शहरात आठवडाभराचा जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविण्यात आले. यावेळी माजी सरपंच मीरा पवार, राजेंद्र वेढणे, किशोर शहा,चतुर सुर्यवंशी,भावडू सोनवणे,दिपक सोनजे, धर्मेंद्र शहा, पृथ्वीराज जाधव, संदिप शहा यांच्यासह अभोण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, बबन पाटोळे, किसन काळे उपस्थित होते.
उपबाजार आवार बंद
जनता कर्फ्यूस प्रतिसाद म्हणून कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात कांद्याचे लिलाव आठ दिवस बंद ठेवण्यात आले आहेत. जनता कर्फ्यू काळात दुकाने उघडी दिसल्यास त्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हा नोंदविण्यात येईल असा इशारा प्रशासकांनी दिला आहे.