विणकर चिंतित : रेशमाचे भाव वाढले; पैठणीचे दर घसरले
By Admin | Updated: July 25, 2016 23:20 IST2016-07-25T22:36:49+5:302016-07-25T23:20:22+5:30
महाराष्ट्राचे राजवस्त्र पैठणीला उतरती कळा

विणकर चिंतित : रेशमाचे भाव वाढले; पैठणीचे दर घसरले
दत्ता महाले : येवला
शहराची आर्थिक बाजारपेठ अवलंबून असणाऱ्या पैठणीला सध्या उतरती कळा लागली असून, ऐन दुष्काळात तेरावा महिना म्हणून गेल्या सहा ते सात महिन्यात रेशमाचे भाव १००० ते १२०० रु पयाने वाढले आहेत. परिणामी सिंगल व डबल पदर रेशमी पैठणीचे भाव १००० रुपयांनी घसरल्याने विणकरांची चिंता वाढली आहे.
शेतकऱ्यांच्या कांद्याला अडतीचा दांडू अडवा आला आणि कांद्याचा वांधा झाला. शेतकरी अडचणीत आले तशीच परिस्थिती येवल्याच्या पैठणीबाबतही सध्या झाली आहे. शहराची मुख्य बाजारपेठ ही कांदा व पैठणीवर अवलंबून आहे. कांद्यासह पैठणीला घसरण सुरू झाल्याने आता शहराच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम जाणवत आहे. बाजारपेठ मंदावली आहे. जानेवारी महिन्यामध्ये अडवाण रेशमाचे भाव २३०० रुपये किलो होते, तर उभार रेशीम २८०० रुपये किलो होते. त्यादरम्यान सिंगल पदरी पैठणीला ५००० रुपये भाव मिळत होता, तर डबल पदराला ५५०० रुपये भाव होता. वर्षाची सुरुवात चांगली झाली होती. घरी एक अथवा दोन हातमाग असणाऱ्यांचे बरे चालले होते. परंतु गेल्या सहा महिन्यात येवल्याच्या पैठणीला उतरती कळा लागली असल्याचे विणकरांचे म्हणणे आहे. जुलै महिन्यात अडवाण रेशमाचे भाव ३५०० रुपये प्रतिकिलो झाले, तर उभार रेशीम ३७०० रुपये प्रतिकिलो एवढे वाढले होते. आणि सध्या पैठणीच्या विक्री किमतीला घसरण लागली असून, सिंगल पदरी पैठणीला ४३०० रुपये भाव मिळत असून, डबल पदरी पैठणीला ४८०० रुपये भाव मिळत आहे.
पैठणीवरील मंदीचे सावट नेमके नैसर्गिक, की कृत्रिम याबाबत कारागीर चर्चा करीत आहेत. सिंगल पदर पैठणी तयार करण्यासाठी किमान पाच ते सहा दिवस लागतात. परंतु सध्या आठवडाभर काम करूनही केवळ ५०० ते ६०० रुपये पदरी पडत असल्याने विणकर मंदीच्या सावटामुळे निराश झाले आहेत. भाव घसरल्याने कामाचा वेगदेखील कमी झाला आहे. विणकर सरासरी दिवसाला ८ ते १० तास काम करतो; मात्र पैठणीच्या भावातील घसरणीमुळे काम करूनही पैसा दिसत नसल्याने दिवसभरात चार ते पाच तास काम विणकर करत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या मालाला उठाव नसल्याने पैठणी विणकरांकडून खरेदी करणेदेखील व्यापाऱ्यांनी कमी केले आहे. एक अथवा दोन हातमाग असणारे विणकर व पन्नास ते शंभर पैठणीचे नग सांभाळण्याची क्षमता नसलेल्या विणकरांना या मंदीचा फटका मोठ्या प्रमाणवर बसत आहे. पुणे, मुंबई शहरात व्यापाऱ्यांना पैठणी विकली तर भाव मिळतो. परंतु दोन चार पैठणीचे नग विक्रीसाठी जाणे सर्वसामान्य विणकराला परवडत नाही त्यामुळे तयार नग हे गावातच कमी भावात विकण्याशिवाय पर्याय नाही.