व्हायचंय लोकप्रतिनिधी अन् त्रास लोकांना...
By Admin | Updated: February 5, 2017 22:50 IST2017-02-05T22:50:35+5:302017-02-05T22:50:58+5:30
संताप : मतदारराजाची वाट ‘बिकट’

व्हायचंय लोकप्रतिनिधी अन् त्रास लोकांना...
नाशिक : लोकांचे प्रतिनिधित्व करण्याच्या इच्छेपोटी जे निवडणूक रिंगणात उतरले आहेत, अशा मंडळींकडूनच जेव्हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या लोकांना त्रास होतो तेव्हा ‘ही डोकेदुखी आता अशीच वाढणार’ असे शब्द मतदारराजाच्या तोंडातून बाहेर पडल्यास आश्चर्य वाटू नये. असाच काहीसा अनुभव काही दिवसांपासून मेनरोड परिसरात येत आहे. निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले व त्यांची छाननीही पार पडली. अजून नागरिकांचा कौलही मिळालेला नाही आणि लोकप्रतिनिधीचा शिक्काही बसलेला नाही; मात्र तरीही केवळ उमेदवारी मिळाल्याच्या बळावरच जेव्हा काही राजकीय कार्यकर्ते वेगळ्याच आविर्भावात वावरतात तेव्हा मतदारराजाची वाट ‘बिकट’ होते. मेनरोड ही शहराची मुख्य बाजारपेठ. त्यामुळे या भागात शहरातून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ असणे स्वभाविक आहे. मेनरोड, दहीपूल, राजेबहाद्दर लेन, धुमाळ पॉइंट, सरस्वती लेन, भद्रकाली परिसरात नागरिक आपल्या वैयक्तिक कामासाठी आलेले असताना पूर्व प्रभागाच्या कार्यालयात सुरू असलेल्या निवडणुकीच्या कागदपत्रांच्या पूर्ततेच्या धामधुमीत बहुतांश उमेदवार व इच्छुकांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क नागरिकांसोबतच अरेरावी केली. वाहनांचा अडथळा, वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना मागील चार दिवसांपासून मेनरोड, दहीपूल भागांतून मतदारराजाच्या नाकीनव येत आहे. यावेळी काही कार्यकर्ते किंवा उमेदवारांकडून मतदारराजावर डोळे ताणणे किंवा वाहनाला चुकून हलकासा धक्का जरी लागला तरी जणू सत्तेची गुर्मी चढते अशा आविर्भावात खडे बोल सुनावण्याचेही प्रकार या भागात घडल्याचे काही नागरिकांनी याचि देहि याचि डोळा बघितले. ज्या लोकांच्या बळावर निवडणुकीत सत्ता मिळवायची आहे त्याच लोकांना कळत-नकळत त्रास होत असल्याची तसूभरही जाणीव पूर्व विभागात गर्दी करणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना नव्हती. त्यामुळे मतदारराजाची वाट मेनरोड, दहीपूल भागांतून बिकट झाली होती. महिलावर्गाने तर संतापून डोक्यावर हात मारत ‘हा काय ताण झालाय’ असे म्हणून नाराजी व्यक्त केली. एकूणच उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मतदारराजाचा ही नाराजी धोक्याची ठरू शकते.