‘जलयुक्त’ गावांमध्ये पाणी कुठे मुरले?
By Admin | Updated: May 1, 2017 01:10 IST2017-05-01T01:10:50+5:302017-05-01T01:10:58+5:30
जलयुक्तची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेली असताना संबंधीत गावांमध्येच टॅँकर सुरू करण्याची वेळ आल्याने त्यावरील २०० कोटींच्या खर्चाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

‘जलयुक्त’ गावांमध्ये पाणी कुठे मुरले?
श्याम बागुल नाशिक
राज्य शासनाने राबविलेल्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेली असताना संबंधीत गावांमध्येच पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर टॅँकर सुरू करण्याची वेळ आल्याने ही कामे व त्यावरील सुमारे २०० कोटींच्या खर्चाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे जलयुक्त शिवार योजनेमुळे भुगर्भातील पाण्याची पातळी वाढली असे एकीकडे छातीठोकपणे सांगितले जात असताना प्रत्यक्षात त्याही बाबतीतली बनवेगिरी शासकीय आकडेवारीनेच उघड झाली आहे.
शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेबाबत जिल्हा प्रशासनाने केलेले दावे किती आभासी आहेत, याचा प्रत्यय येऊन गेला आहे. ‘पावसाचे पाणीच जमिनीत मुरते’ हे भूजलतज्ज्ञांचे सर्वमान्य शास्त्र असताना सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २२९ गावांमध्ये करण्यात आलेल्या ८१०० विविध कामांमुळेच पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचा दावा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केला आहे. परंतु काही ‘जलयुक्त’ गावांमध्येच चक्क टॅँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने या योजनेवरील सुमारे २०० कोटी रुपयांच्या खर्चाबाबत नेमके पाणी कुठे मुरले, हा संशोधनाचा भाग बनला आहे. गेल्या वर्षी जुन ते सप्टेंबर या तीन महिन्यांत जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०२ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे.
दरवर्षी पावसाळ्यानंतर भूजल पातळीत सरासरी पाच ते सहा फुटांपर्यंत वाढ अपेक्षितच धरली जात असल्याचे भुजल सर्व्हेक्षण विभागाचे म्हणणे आहे. यात जलयुक्तची भर पडत्यामुळे भुगर्भातील पाणी साठ्यात वाढ होऊन संबंधित गावांतील पाणीटंचाई कमी झाल्याच्या तसेच शेती शिवार फुलल्याच्या यशोगाथा कानी पडायला हव्यात. परंतु, १४ गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे होऊनही प्रशासनावर तेथे टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली आहे. मालेगाव तालुक्यात एक मिली मीटरही विहिरींच्या पाणी साठ्यात वाढ झाली नसल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यातील २२९ गावांमध्ये करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील ८१०० विविध प्रकारच्या कामांवर विविध यंत्रणांनी एकाच वर्षात तब्बल १८० कोटी ७० लाख रुपये खर्च केले आहेत. पण टँकरमुक्ती होऊ शकली नाही़
एप्रिलअखेर जिल्ह्यात काही गावांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वाढता उष्मा आणि धरणातील कमी होत चाललेला पाणीसाठा पाहता मे आणि जून महिन्यांत परिस्थितीत आणखी बदल होऊन टॅँकरची संख्या वाढू शकते. कदाचित जलयुक्त गावांनाही टॅँकरने पाणीपुरवठ्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे यंदा जलयुक्त गावांमध्ये एकही टॅँकर सुरू होऊ शकला नसल्याचा दावा तकलादू आणि शासनाचीच दिशाभूल करणारा ठरला आहे़प्रशासनाची ‘अशीही’ बनवाबनवीजिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१६-१७ मध्ये २१८ गावांमध्ये ४३३३ इतकी कामे करण्यात येणार असून, त्यापैकी ३३२७ इतकी कामे पुर्ण झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. विशेष म्हणजे जलयुक्त शिवार योजनेची कामे केलेल्या गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा न करण्याची भूमिका घेणाऱ्या प्रशासनाने जलयुक्तची कामे झालेल्या गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी यंदा कोट्यवधीची तरतूद कायम ठेवली आहे तसेच टंचाई आराखड्यात जलयुक्तची कामे झालेल्या गावांचाही समावेश करण्याची बनवेगिरीही केली आहे.