सिन्नरच्या एमजीनगर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

By Admin | Updated: September 12, 2015 22:26 IST2015-09-12T22:25:33+5:302015-09-12T22:26:10+5:30

पथदीप बंद : जलवाहिनीच्या खोदकामामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था

Water supply in Sinnar's Amjinagar area was disrupted | सिन्नरच्या एमजीनगर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

सिन्नरच्या एमजीनगर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

सिन्नर : येथील शिर्डी रस्त्यावरील एमजीनगर भागात दोन महिन्यांपासून विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच या भागातील अनेक पथदीप बंद अवस्थेत असून, रस्त्यांचीही अवस्था दयनीय झाली आहे.
सिन्नर नगरपालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीसाठी सध्या विजयनगर परिसरात खोदकाम सुरू आहे. यामुळे वापरात असलेली जुनी जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटल्याने एमजीनगरमध्ये नगरपालिकेकडून चार-पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनी नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढल्याने अनेक भागांतील नळांना पाणीच पोहोचत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. सिन्नर शहराच्या उपनगरांना चार-पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, विजयनगर परिसरातील जुन्या जलवाहिनीचा व्हॉल्व कोणीही नागरिक वाटेल तसा फिरवून पाणी वळवून घेण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे ठरावीक परिसरात खूप वेळ पाणीपुरवठा होतो. मात्र, एमजीनगरमधील नागरिकांना नेहमीच पाण्यापासून वंचित रहावे लागते आहे. असा प्रकार अनेकदा घडत असून, त्यावर नगरपालिकेचे नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. याप्रकाराबाबत नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना अनेकदा माहिती दिली आहे. मात्र, तक्रार आल्यानंतर तात्पुरती थातूरमातूर उपाययोजना केली जाते. काही काळानंतर पुन्हा ‘पहिलेपाढे पंचावण्ण’ अशी स्थिती आहे. पालिका प्रशासनाच्या ढिसाळ भूमिकेमुळे एमजीनगरातील महिलांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नव्या जलवाहिनीचे खोदकाम व पाइपलाइन करण्याचे काम संथगतीने सुरू असल्याने एमजीनगरातील अनेक रस्ते बंद झाले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांची कुचंबणा होत आहे. रस्त्यांवर केलेले खोदकाम पाईप टाकून तातडीने बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सांडपाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने अस्वच्छता वाढली आहे. एमजीनगरात अनेक ठिकाणचे पथदीप बंद पडले आहेत. एमजीनगर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासह रस्त्यांवरील खोदकाम तातडीने जलवाहिनी टाकून बुजवावे व सर्व पथदीप सुरू करण्याची मागणी नगरवासीयांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Water supply in Sinnar's Amjinagar area was disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.