चार गावे, दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
By Admin | Updated: April 30, 2017 00:19 IST2017-04-30T00:19:44+5:302017-04-30T00:19:57+5:30
येवला : तालुक्यात चार गावे आणि दोन वाड्यांना दोन शासकीय टँकरद्वारे पाण्याच्या दररोज आठ खेपा सुरू झाल्या आहेत.

चार गावे, दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
येवला : तालुक्यात चार गावे आणि दोन वाड्यांना दोन शासकीय टँकरद्वारे पाण्याच्या दररोज आठ खेपा सुरू झाल्या आहेत. कॅनाललगतच्या असणाऱ्या शेकडो डोंगळ्यांच्या करामतीमुळे पालखेडचे आवर्तन लांबल्याने येवला तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा अंत न पाहता पालखेडचे आवर्तन लवकर सोडावे, अशी मागणी होत आहे. येवला तालुक्याचे उत्तर-पूर्व भागातील बंधारेदेखील पिण्याच्या पाण्यासाठी भरून देण्याची मागणी होत आहे.
चांदगाव, कुसमाडी, बाळापूर, आडसुरेगाव ही चारी गावे आणि सायगाव (महादेववाडी), ममदापूर (तांडा वस्ती) या दोन वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
शिवाय तालुक्यातील दहा गावांसह दोन वाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकऱ्यांकडे मंजुरीसाठी दाखल करण्यात आले आहेत. या दहा गावांमध्ये आहेरवाडी, जायदरे, खैरगव्हाण, खरवंडी, देवळाणे, दुगलगाव, बदापूर, बोकटे, कोळगाव, धामणगाव यांचा समावेश आहे, तर मातुलठाण अंतर्गत, कातुरे वस्ती, बांगर वस्ती, खैरगव्हाण (गोपाळवाडी) या वाड्यांना सध्या तीव्र पाणीटंचाई भासत आहे.
देवठाण, वाईबोथी, खरवंडी या तीन गावासह नगरसूल अंतर्गत चार वाड्यावस्ती येथे गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांची संयुक्त समिती संबंधित पाणीटंचाईच्या गावाला पाहणी केली आहे. त्याबाबतदेखील कार्यवाही चालू असल्याची माहिती पंचायत समिती सूत्रांनी दिली. यापाठोपाठ कोळगाव खुर्द, कोळम बुद्रुक, पांजरवाडी, गारखेडा या चार गावांसह कोळम बुद्रूकमधील महादेव वाडी, कोळम खुर्दमधील पिसाळवस्ती, चव्हाण वस्ती या गावांचे प्रस्ताव पाहणीसाठी तहसीलदारांकडे दाखल आहेत. येवला तालुक्यात पाणीटंचाई डोकावू लागली असून, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे स्रोत आटले असून, पाणीटंचाईची जोरदार झळ बसायला सुरुवात झाली आहे. पालखेडचे आवर्तन जर अधिक काळ लांबले तर भीषण पाणीटंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे स्रोत आटले असून, पाणीटंचाईची झळ बसायला सुरु वात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी पेक्षा अधिक ४८२ मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याने तुलनेने पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली असली तरी तालुका टँकर मुक्त होण्यासाठी नवीन पाणीस्रोत व साठवण करण्याची गरज नक्कीच आहे. तालुक्यातील येथील विहिरीचा स्रोत आटले आहेत. पाणीटंचाईचे हे ग्रहण कधी सुटणार या खरा प्रश्न आहे. (वार्ताहर)