हलगर्जीपणामुळे पाणीटंचाई
By Admin | Updated: May 7, 2016 22:16 IST2016-05-07T22:15:42+5:302016-05-07T22:16:38+5:30
चांदवड तालुका : ५६ गावांना फटका; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे दुर्लक्ष

हलगर्जीपणामुळे पाणीटंचाई
महेश गुजराथी चांदवड
चांदवड तालुक्याच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी केलेल्या उपाययोजना संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दुर्लक्षित झाल्या असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
यासंदर्भात ओझरखेड धरणावरून माजी आमदार जयचंद कासलीवाल यांनी शासनाच्या पाठीलागून ४४ गाव नळ योजना करून घेतली होती. या योजनेची व्याप्ती वाढवून चांदवड तालुक्यातील सुमारे ५८ गावांना या योजनेचे पाणी गेल्या १५ वर्षांपासून मिळत होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ओझरखेड धरणातील जीवंत पाणीसाठा उचलण्याची परवानगी देताना योग्य बाबींचा विचार केला नाही. यामुळे आजमितीस मृत साठ्यातून पाणी घेण्याची वेळ आली असल्याचा निष्कर्ष जाणकारांनी काढला आहे. धरणातील जीवंत साठा आज असता तर या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले नसते अशी स्थिती ओझरखेड धरणावर प्रत्यक्ष पाहणी केली असता समोर आली.
यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच नव्हे तर संबंधित पाटबंधारे खाते, जिल्हाधिकारी यांनी जीवंत साठ्यातून पाणी उचलण्याची परवानगी दिली नसती, तर चांदवड तालुक्यातील या गावांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले नसते, असा निष्कर्ष पाहणीनंतर पदाधिकाऱ्यांनी काढला आहे.
१५ ते १८ वर्षांपूर्वी चांदवड तालुक्यासाठी ओझरखेड धरणावरून पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ४४ गाव नळ योजना सुरू केली होती. तत्कालीन सरकारने या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च केला. त्यानंतर माजी आमदार जयचंद कासलीवाल सरकारच्या पाठीलागून योजना पूर्ण करून घेतली, तर माजी आमदार शिरीश कोतवाल यांनी या ४४ गाव योजनेसाठी धोडंबे येथे जल शुद्धीकरण केंद्र मंजूर करून कार्यान्वित केले होते. त्यामुळे दोन वर्षांपासून चांदवड तालुक्यातील सुमारे ५६ ते ५८ गावांचा पाणीप्रश्न सुटला होता.
ओझरखेड धरणाची साठवण क्षमता २१०० दलघफू असून, आता अवघा ३०० दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. या योेजनेसाठी असलेल्या मोटारी जुन्या झाल्याने गाळ व क्षारामुळे त्या बंद पडल्या आहेत. आज दुसऱ्या योजनेच्या ४०० एचपीचे पंप आणून पाणी उपसा होत आहे. ओझरखेड धरणापासून धोडंबे जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत ४५७ एमएम व्यासाची एमएस लाइन टाकून दोन किमीपर्यंत जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा केला जातो. यापुढे २८ किमीमीटर ५६ ते ५८ गावांना प्लॅस्टिक पाइपद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सातत्याने ४० तास पंपिग झाले तर या सर्व गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होतो. मात्र येथील जॅकवेलला सुमारे ३८० ते ४४० व्होल्टेज लागते. बऱ्यावेळा व्होल्टेजच्या तक्रारींमुळे पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. शासनाने खास मंजुरी देऊन येथे ७५ लाख रुपये खर्चून एक्स्प्रेस फिडर टाकला आहे. या योजनेचे काही पंप खराब झाल्याने व ही योजना जुनी झाल्याने पंप तातडीने बदलण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे प्रलंबित असल्याचे जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे. यासाठी दुसऱ्या योजनेचे पंप आणून सध्या पाणीपुरवठा होत आहे. दररोज ५० ते ६० लाख लिटर पाणी ओझरखेडे धरणात पाणी असताना धोडंबेपर्यंत पाणी जात होते; मात्र ६० किमीच्या लाइनमध्ये मोठ्या प्रमाणात गळतीचे प्रमाण, चोरीचे प्रमाण वाढल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या पाइपलाइनकडे पूर्णवेळ लक्ष देऊ शकत नाही. ओझरखेड धरणावर व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर धरणातील पाणीसाठा व इतर माहिती घेण्यासाठी गेलेले चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, नगरसेवक व शिवसेना गटनेते जगन्नाथ राऊत, पाणीपुरवठा सभापती अशपाक खान, संदीप उगले, नगरसेवक अॅड. नवनाथ अहेर, बाळासाहेब वाघ, सुनील डुंगरवाल, प्रा. एन. झेड. जैन, अंकुर कासलीवाल, गणेश पारवे, रवि बडोदे, बाळा पाडवी, राहुल हांडगे, संदीप कोतवाल आदिंना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता डी.एम. शहा, शाखा अभियंता डी. जे. भोसले यांनी ही माहिती दिली.