Water scarcity in Trimbak taluka | त्र्यंबक तालुक्यात पाणीटंचाईची धग

त्र्यंबक तालुक्यात पाणीटंचाईची धग

ठळक मुद्देविहिरींनी गाठला तळ : पाण्यासाठी महिलांची भटकंती

त्र्यंबकेश्वर : उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला लागताच तालुक्यातील पाण्याचे स्रोत आटू लागले असून, त्यामुळे काही गावांना पाणी टंचाईची झळ आतापासूनच लागायला सुरुवात झाली आहे. मूळवड ग्रामपंचायत अंतर्गत वळण, घोटबारी, सावरीचा माळ, चौरापाडा, बारीमाळ या भागात विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

मागील वर्षी त्र्यंबकेश्वरला १४२३.८ मि. मी. पाऊस पडला होता. पावसाचे शेकडा प्रमाण ७५.३६ टक्के होते; मात्र यावर्षी मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पाणी टंचाईची धग जाणवायला सुरुवात झाली आहे. या पाणीटंचाईसंदर्भात मुळवडचे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ घाटाळ, सरपंच चंचला बळीराम बांगाड यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांसह पंचायत समिती सभापतींकडे कैफीयत मांडली; पण प्रशासनाकडून अद्याप काहीही उपाय योजना झालेली नाही. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास हंडामोर्चा काढण्याचा इशारा घाटाळ यांनी दिला आहे. टंचाईग्रस्त गावांबरोबरच तालुक्यातील वळण, बर्ड्याची वाडी, विनायक नगर, सोमनाथ नगर, शिवाजीनगर आदी भागातीलही विहिरी आटू लागल्या आहेत. तालुक्यात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या १० कामांचे प्रस्ताव प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. दहापैकी केवळ चारच प्रस्तावांना मंजुरी मिळाली. अन्य सहा कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहेत. बर्ड्याच्या वाडीच्या पाणी प्रश्नाची तर सर्वत्र चर्चा झाली; परंतु तेथीलही पाणी टंचाईचा प्रश्न पूर्णपणे सुटू शकलेला नाही.

पडताळणीत वेळकाढूपणा
पाणीटंचाईच्या काळात टँकरची मागणी होऊनही प्रशासनाकडून त्याबाबत दुर्लक्ष केले जाते. तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये सेवाभावी संस्थांच्यावतीने पाणीटंचाईबाबत उपाययोजना केल्या जात असतात. त्यामुळे प्रशासनाकडूनही या सेवाभावी संस्थांची प्रतीक्षा केली जात असते. प्रशासनाकडे स्थानिक स्तरावरून टंचाई प्रस्ताव पाठविले जात असले तरी त्याच्या पडताळणी प्रक्रियेतच वेळकाढूपणा केला जात असतो. त्यामुळे लालफीतीच्या कारभाराचा अनुभव येत असतो.

(०१ विहिरी)

Web Title: Water scarcity in Trimbak taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.