दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसाठी सिन्नरला पाणी आरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:11 IST2021-06-24T04:11:43+5:302021-06-24T04:11:43+5:30

नाशिक जिल्ह्यात पुरेसे पाणी नसल्याचा अहवाल देऊन काही वर्षांपूर्वी दिल्ली-मुंबई या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमधून नाशिक जिल्ह्याला वगळण्यात आले होते. नाशिक ...

Water reserved for Sinnar for Delhi-Mumbai corridor | दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसाठी सिन्नरला पाणी आरक्षित

दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसाठी सिन्नरला पाणी आरक्षित

नाशिक जिल्ह्यात पुरेसे पाणी नसल्याचा अहवाल देऊन काही वर्षांपूर्वी दिल्ली-मुंबई या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमधून नाशिक जिल्ह्याला वगळण्यात आले होते. नाशिक शहरातील दोन औद्योगिक वसाहतींबरोबरच सिन्नर, दिंडोरी या औद्योगिक वसाहतीला या कॉरिडॉरपासून दूर ठेवण्यात आले होते. औद्योगिक वसाहतीसाठी पुरेसे पाणी नसल्याचे महत्त्वाचे कारण देण्यात आले होते. या संदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न सुरू केले असता, प्रस्तावित असलेल्या अप्पर-वैतरणा-कडवा-देवलिंक नदीजोड प्रकल्पामुळे जिल्ह्याला अधिकचे पाणी उपलब्ध होणार असल्याचे पत्र जलसंपदा विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहे. या नदीजोड प्रकल्पाच्या पाण्यातून २.६ टीएमसी पाणी मुंबई-दिल्ली कॉरिडाॅर प्रकल्पासाठी आरक्षित करण्यात आल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.

राज्यातील औरंगाबाद आणि नाशिक येथे दिल्ली-मुंबई कॉरिडाॅर करण्याचा निर्णय गेल्या चार वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई कॉरिडाॅरचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. मात्र प्रकल्पासाठी लागणारे पाणी उपलब्ध नसल्याने नाशिक जिल्ह्यात दिल्ली-मुंबई कॉरिडाॅर प्रकल्प होऊ शकला नाही. दिल्ली-मुंबई कॉरिडाॅरमुळे नाशिक जिल्ह्याचा विकास होणार असल्याने प्रकल्पासाठी पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, प्रस्तावित अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक नदीजोड प्रकल्प या प्रकल्पातून दिल्ली-मुंबई कॉरिडाॅर २.६ टीएमसी पाणी आरक्षित करावे, यासाठी गोडसे यांनी शासनाकडे सततचा पाठपुरावा केला होता. अखेर जलसंपदा विभागाने दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पासाठी प्रस्तावित अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक नदीजोड प्रकल्पातून २.६ टीएमसी पाणी आरक्षित करण्याचे मान्य केले आहे. याविषयीचे पत्र जलसंपदा विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाला नुकतेच दिले आहे.

चाैकट

असे वळविणार पाणी

वैतरणा व दमणगंगा खोऱ्यातून एकूण २०२ दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यातील देव नदी व देव नदीच्या उपनद्यांच्या खोऱ्यात सिन्नर तालुक्यात वळविणे प्रस्तावित आहे. सदर उपलब्ध पाण्यापैकी दिल्ली, मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या वापरासाठी एकूण ७३.०० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित ठेवण्यात आले असल्याचे जलसंपदा विभागाच्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Water reserved for Sinnar for Delhi-Mumbai corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.