बरड्याच्या वाडीचा पाणीप्रश्न तूर्तास मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 23:41 IST2020-04-07T23:41:13+5:302020-04-07T23:41:43+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यात टाके देवगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बरड्याची वाडी भुकेबरोबरच तहानेनेदेखील व्याकूळ झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये झळकताच गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी ग्रामपंचायत निधीतून तातडीने टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बरड्याच्या वाडीला टँकरने पाणी- पुरवठा सुरू झाला असून, तुर्तास पाण्याची समस्या मिटली आहे.

बरड्याच्या वाडी येथे सुरु करण्यात आलेला पाण्याचा टँकर.
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात टाके देवगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बरड्याची वाडी भुकेबरोबरच तहानेनेदेखील व्याकूळ झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये झळकताच गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी ग्रामपंचायत निधीतून तातडीने टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बरड्याच्या वाडीला टँकरने पाणी- पुरवठा सुरू झाला असून, तुर्तास पाण्याची समस्या मिटली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी आल्याशिवाय अधिकृत टँकर सुरू होऊ शकत नाही आणि ग्रामपंचायत स्वनिधीतून दररोज टँकर देऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे. गावात पाण्यासारखी ज्वलंत समस्या असताना ग्रामसेवकदेखील १५ दिवस रजेवर असल्याचे समजते. या गावासाठी २५ लाख रुपये खर्चाची ग्रामीण पाणीपुरवठा योजना शासनाकडेच मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
वावी हर्ष येथील उपसा जलसिंचन सहकारी संस्थेच्या मालकीच्या विहिरीला स्रोत बनवून या विहिरीला योजना केल्यास त्या विहिरीतून बरड्याच्या वाडीला बाराही महिने २४ तास पाणीपुरवठा होऊ शकेल, असा एक मतप्रवाह आहे.
ही विहीर बरड्याच्या वाडीपासून तीन किमी अंतरावर असल्याने विहीर गृहीत धरूनच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने योजना तयार करून शासनाकडे पाठविली आहे.