दारणा धरणसमूहातून सिंचनासाठी पाणी सोडले
By Admin | Updated: January 12, 2016 00:33 IST2016-01-12T00:30:27+5:302016-01-12T00:33:31+5:30
दोन टीएमसी पाण्याचा होणार विसर्ग

दारणा धरणसमूहातून सिंचनासाठी पाणी सोडले
घोटी : मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या आणि सिंचनासाठी पाण्याची भिस्त असलेल्या दारणा धरणसमूहातून दुसऱ्यांदा सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
पहिल्या विसर्गाच्या वेळी धरणालगतच्या शेतकऱ्यांनी केलेला कडवा विरोध लक्षात घेता यावेळीही प्रखर विरोध होईल असे अपेक्षित असताना मात्र आज कोणत्याही विरोधाशिवाय हे पाणी सोडण्यात आले. दरम्यान, यामुळे जानेवारी महिन्यातच धरण तळ गाठणार असल्याने पाणीटंचाईची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नगर जिल्ह्यातील फळबागा व पिके वाचविण्यासाठी दारणा धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्यात यावे, असे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार रविवारी दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले
आहे.
पाणी सोडण्याचे जाहीर होताच इगतपुरी तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या व कुठल्याही परिस्थितीत पाणी सोडू देणार नाही, अशी भूमिका शेतकरी व राजकीय पक्षांनी घेतली होती; मात्र पाणी सोडण्याच्या वेळी कुणी धरणाकडे फिरकलेही नाही.
जलसंपदा तथा पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार दारणा धरणातून नगर जिल्ह्यातील फळबागा तसेच शेती वाचविण्यासाठी दोन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाने रविवारी दारणा धरणातून ११०० क्यूसेसने पाणी सोडले आहे. (वाार्ताहर)