महागड्या कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 03:01 AM2019-09-24T03:01:49+5:302019-09-24T03:03:51+5:30

लासलगावातही भावात घट; किरकोळ बाजारात तेजी, डिसेंबरपर्यंत भाव चढेच

Water in the eyes of consumers with expensive onions | महागड्या कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी

महागड्या कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी

Next

नाशिक : कांद्याच्या भावाने नुकतीच ५० रुपयांची पातळी ओलांडल्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याचे भाव २३० रुपयांनी घसरल्याने केंद्र सरकार सध्या साठवणुकीवर निर्बंध आणण्याचा विचार करीत असल्याच्या वृत्ताने व्यापारीही चिंतेत आहेत. नवीन कांदा येईपर्यंत भाव चढेच राहण्याची शक्यता आहे.

पंधरा दिवसांपासून किरकोळ बाजारात कांद्याचा दर पन्नास रुपयांवर गेल्याने ग्राहक चांगलाच हबकून गेला आहे. गेले काही दिवस राज्यात सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी साठवलेला कांदा खराब झाला आहे. कांद्याच्या रोपांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यामुळे बाजारातील कांद्याची आवक कमी झाल्याचे दिसत आहे, पण ग्राहकाकडून कांद्याची मागणी कायम राहिल्याने कांद्याचे भाव चढेच आहेत. नवीन लाल कांदा बाजारात येण्याला डिसेंबरअखेर होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत कांद्याचे भाव वाढलेलेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

लासलगावमध्ये आज कांदा भावात २३० रुपयांनी घट झाली. लिलावात १,४०१ ते ४,२४७ रुपयांदरम्यान भाव जाहीर झाले. सरासरी भाव ३,९०० रुपये होता. बाजारपेठेत ५१० वाहनांतून कांदा आवक झाली. मागील सप्ताहाच्या तुलनेत भावामध्ये ८५० रुपयांची घसरण झाली आहे. केंद्राच्या शिष्टमंडळाने मागील सप्ताहामध्ये लासलगावला भेट देऊन माहिती घेतली. या पथकाच्या भेटीनंतर केंद्र सरकार कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध आणण्याची शक्यता आहे.

येत्या दोन दिवसांत दर कमी न झाल्यास सरकार कांदा व्यापाऱ्यांवर साठ्याबाबत मर्यादा घालणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे व्यापारी कांदा खरेदी करताना सावध भूमिका आहेत. नाफेड व एनएससीएफ यांनी कांदा २२ रुपये किलो दराने विकणे सुरू ठेवले आहे. मदर्स डेअरी कडून कांदा २३ रुपये ९० पैसे प्रतिकिलो दराने दिला जात आहे. तरीही कांद्याचे किरकोळ बाजारातील दर कमी होताना दिसत नाहीत.

निवडणुकीमुळे भीती
कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे दिल्लीतील भाजपच्या सरकारला १९९८ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कांद्याच्या वाढलेल्या भावाचा सत्ताधारी पक्षाने धसका घेतला. महाराष्टÑ व हरियाणात विधानसभा निवडणूक होत असल्याने केंद्राने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

विविध ठिकाणचे दर जास्तच
सध्या दिल्लीसह मोठ्या शहरांमध्ये कांद्याचे भाव ७० ते ७५ रुपये प्रतिकिलो झाले आहेत. गुरगाव व जम्मूत कांद्याचे भाव साठ रुपये किलो असल्याचेही मंत्रालयाचे म्हणणे आहे. मुंबईतही कांद्याचा दर ६0 रुपये आहे.

Web Title: Water in the eyes of consumers with expensive onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा