बिजोटे येथे पाणी परिषद
By Admin | Updated: September 12, 2015 00:11 IST2015-09-12T00:11:20+5:302015-09-12T00:11:56+5:30
सुभाष भामरे : हरणबारी डावा व उजवा कालव्याच्या कामासाठी मदतीचे आश्वासन

बिजोटे येथे पाणी परिषद
जायखेडा : सततच्या दुष्काळामुळे शेतोपयोगी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेती व्यवसाय उद्ध्वस्त झाला असून, शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. यामुळे पाण्याचे महत्त्व व सिंचनाची गरज शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागली आहे. बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणाचा डावा व उजवा कालवा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्याच्या पूर्णत्वासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे.
यासंदर्भात बिजोटे येथे पाणी परिषद घेण्यात आली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. सुभाष भामरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रशांत पाटील, डॉ. शेषराव पाटील, डॉ. विलास बच्छाव, पंचायत समिती सभापती जिजाबाई सोनवणे, गजेंद्र अमाळकर, नगरसेवक साहेबराव सोनवणे, अण्णासाहेब सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख दीपक पगार, हरणबारी उजवा कालवा संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक ह्याळीज, सुभाष कांकरिया, संजय भामरे आदि मान्यवर उपस्थित होते.
खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन हरणबारी डावा व उजवा कालव्याच्या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून काम पूर्णत्वास नेऊन येत्या काही दिवसात सटाणा तालुक्यातील सिंचनाची रखडलेली कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेप्रमाणेच लोकसहभागातून हे सरकार जलयुक्त शिवार अभियान गावागावापर्यंत पोहचवून शेतीचा विकास साधणार आहे. हरणबारी उजवा व डावा कालवा मार्गी लावण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनात खांद्याला खांदा लावून सहभाग घेण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खिरमानी येथील केशव भदाणे, पिंगळवाडेचे कृष्णा भामरे, हरणबारी उजवा कालवा संघर्ष समितीचे अध्यक्ष किशोर ह्याळीज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पिंगळवाडे, करंजाड, भुयाणे, निताणे, पारणेर, बिजोटे, आखतवाडे, गोराणे, आनंदपूर, आसखेडा, कोटबेल, खिरमाणी, कुपखेडा, नळकेस, सारदे, रामतीर, वायगाव, सुराने, दुंधे, देवळाने, रातीर, सातमाने आदि गावातील सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)