नदीपात्रातील पाणीचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2016 23:57 IST2016-03-17T23:55:02+5:302016-03-17T23:57:26+5:30
मोटारी लावून सर्रास होतोय उपसा : यंत्रणेची मात्र सोयीस्कर डोळेझाक

नदीपात्रातील पाणीचोरी
अझहर शेख नाशिक
गंगापूर धरण व धरण समूहामधील जलसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाणीकपात सुरू केली आहे. आठवड्यातून एक दिवस शहरातील नळ कोरडे पडत असून, लवकरच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होण्याचे संकेत प्रशासनाने दिले असताना दुसरीकडे नदीपात्रात धरणामधून येणाऱ्या पाण्याचा शेतीसाठी सर्रास उपसा केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नदीपात्रात चोरीछुप्या पद्धतीने विद्युत पंपाद्वारे पाण्याचा उपसा सर्रासपणे होत आहे.
गंगापूर धरणामधील पाण्याची पातळी खालावली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जुलै महिन्यापर्यंत जलसाठा पुरविण्याचा यक्षप्रश्न महापालिका प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने आठवड्यातून एक दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली असून, लवकरच या निर्णयात बदल होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे शहरवासीयांना एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागणार आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला असताना गंगापूर धरणापासून तर थेट हनुमानवाडीपर्यंत नदीपात्रात चोरट्या मार्गाने पंप लावून पाण्याचा उपसा केला जात आहे. शेतकऱ्यांनी सर्रासपणे नदीच्या काठावर पंप बसविले आहेत; मात्र याकडे जलसंपदा विभागासह जिल्हा प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. एकू णच नदीपात्रातील पाण्याचा उपसा सर्रासपणे सुरू असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. काही शेतकरी, बांधकाम व्यावसायिक, गोठेचालक सर्रासपणे नदीपात्रात मोटारी सोडून पाणीचोरी करत आहे.
धरणामध्ये असलेला आरक्षित पाणीसाठा केवळ पिण्यासाठी वापरण्यात यावा, दुष्काळी परिस्थितीत याचे काटेकोरपणे पालन केले जावे, असे आदेशित केले आहे; मात्र तरीदेखील सर्रासपणे काही शेतकऱ्यांनी शेकडो मीटरपर्यंत धरणातून पाइपद्वारे पाण्याचा उपसा सुरू ठेवला आहे. तरीदेखील याकडे प्रशासनाचे लक्ष जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.