एमपीए संचालकपदी बुराडे; ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी दराडे
By Admin | Updated: April 29, 2017 01:57 IST2017-04-29T01:56:51+5:302017-04-29T01:57:06+5:30
नाशिक :सरकारने राज्य पोलीस सेवा व भारतीय पोलीस सेवेतील विशेष पोलीस महानिरीक्षक, अपर अधीक्षक संवर्गातील १३१ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत़

एमपीए संचालकपदी बुराडे; ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी दराडे
नाशिक : राज्य सरकारने पोलीस विभागात मोठे फेरबदल केले असून, त्यामध्ये राज्य पोलीस सेवा व भारतीय पोलीस सेवेतील विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, उपआयुक्त, अपर अधीक्षक संवर्गातील १३१ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत़ नाशिक जिल्ह्णातील आठ अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यामध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संजय दराडे यांची तर महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालकपदी प्रशांत बुराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ याबरोबरच नाशिक शहरातील तीन पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे़
राज्याच्या गृहविभागाने गुरुवारी (दि़२७) रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश काढले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक नवल बजाज यांची कोकण परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी तर कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुराडे यांची महाराष्ट्र पोलीस अकादामीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे़ ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांची नागपूरच्या उत्तर प्रादेशिक विभागाच्या अपर आयुक्तपदी तर नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संजय दराडे यांची नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे़
शहर पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस उपआयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या असून, पोलीस उपायुक्त विजय पाटील (प्रशासन) यांची नागपूरच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपआयुक्त दत्तात्रेय कराळे (गुन्हे) यांची जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी तर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांची अमरावती पोलीस आयुक्तालयात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे़
नाशिक ग्रामीणमधील मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची नागपूरला उपायुक्तपदी, महाराष्ट्र पोलीस अकादमीतील अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांची सोलापूर, श्याम घुगे यांची खामगाव, रोहिदास पवार यांची श्रीरामपूर येथे अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)