पांगरीकरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
By Admin | Updated: March 16, 2016 08:27 IST2016-03-16T08:26:11+5:302016-03-16T08:27:27+5:30
पांगरीकरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

पांगरीकरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
बोजवारा : बारा दिवसांपासून पाणी नाही पांगरी : मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचा नियोजना-अभावी बोजवारा उडाला आहे. बारा दिवसांपासून सदर योजनेचे पाणी पांगरी येथे येत नसल्याने पांगरीकरांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे.
पाच वर्षांपासून पांगरी परिसरात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने सर्वच विहिरी, नदी-नाले कोरडेठाक पडले असून, पांगरीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर व मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून रहावे लागत आहे. सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी आले तरच गावात नळपाणीपुरवठा केला जातो. अन्यथा ग्रामस्थांना खासगी टॅँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत लागते. मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतील पांगरी शेवटच्या टोकाचे व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव आहे. धरणापासून पांगरी गावाचे अंतर खूप लांब असल्याने येथे पाणी पोहचण्यासाठी नेहमीच अडचण येत असते. योजनेद्वारे पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जात नाही. अपुऱ्या दाबाने कधी पाणी आले तर जलवाहिनी फुटते किंवा काही वेळा जाणूनबुजून फोडली जाते. पाइपलाइन चांगली असली तरी धारणगावपर्यंत पाणी येते; मात्र पांगरीत पाणी येत नाही. मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा समितीने पांगरीकरांच्या समस्येकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. योजनेच्या पदाधिकाऱ्यांना पांगरी येथील ग्रामस्थांनी पाण्याबाबत विचारणा केल्यानंतर आज किंवा उद्या पाणी येईल असे सांगितले जाते. पाणीपुरवठा समितीचे कर्मचारी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप सदस्य प्रकाश पांगारकर यांनी केला आहे. (वार्ताहर)