खड्ड्यांमुळे रस्त्यांची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:57 IST2019-07-31T00:57:27+5:302019-07-31T00:57:37+5:30
जुने सिडको येथील बडदेनगर ते सपना थिएटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, सोमवारी नगरसेवक कल्पना पांडे यांनी या रस्त्याची अधिकाऱ्यांसमेवत पाहणी केली. सिडकोच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, रस्त्यांवर असलेले खड्डे आणि दुर्लक्षित झालेल्या रस्त्यांबाबत प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खड्ड्यांमुळे रस्त्यांची वाट
सिडको : जुने सिडको येथील बडदेनगर ते सपना थिएटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, सोमवारी नगरसेवक कल्पना पांडे यांनी या रस्त्याची अधिकाऱ्यांसमेवत पाहणी केली. सिडकोच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, रस्त्यांवर असलेले खड्डे आणि दुर्लक्षित झालेल्या रस्त्यांबाबत प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिडकोतील प्रभाग क्रमांक २४ मधील बडदेनगर ते खोडेमळा परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्याने ये-जा करणेही कठीण झाले आहे. संततधार पावसामुळे या रस्त्यावर संपूर्ण ठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याची चाळणी झाली आहे. याच रस्त्यावर सपना थिएटरसमोर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहत आहे. या रस्त्यावर सर्वाधिक पाणी साचत असून, या पाण्यातून वाहने जातांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असताना केवळ काम सुरू न केल्याने नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
त्याचबरोबर पेलिकन पार्क आणि गणेशचौक परिसरातील रस्त्यांवर गुडघ्यांएवढे पाणी साचल्याचे दिसून येत आहे. गोविंदनगर परिसरातील सर्वच नववसाहती आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसत आहे. रस्त्यांवर असलेले खड्ड्यांमुळेच पाणी साचल्याचे दिसून येत आहे. आयटीआय पूल ते डीजीपीनगर रस्त्याची सुद्धा चाळण झाली असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, असा काही प्रकार याठिकाणी बघावयास मिळत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात सिडकोतील गणेश चौक, एन-८ सेक्टर, बाजीप्रभू चौक, पेलिकन पार्कच्या पाठीमागील भाग, उपेंद्रनगर, शांतीनगर, शाहूनगर यांसह परिसरातील नागरिकांच्या घरात थेट पावसाचे पाणी शिरत असून, यामुळे नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान होत असतानाही याबाबत मनपाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बडदेनगर ते पाटीलनगरदरम्यान नवीन रस्ता तयार करण्याची मंजुरी मिळालेली असून, यासाठी प्रभागाच्या चारही नगरसेवकांनी पाठपुरावा केला आहे. पावसाळा संपताच नवीन रस्ता कामास सुरुवात करण्यात येणार आहे. पावसामुळे या रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, खराब झालेल्या रस्त्याची त्वरित डागडुजी करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- कल्पना पांडे, नगसेवक, प्रभाग-२४
सिडकोतील गणेश चौकात पहाटेच्या सुमारास संपूर्ण सिडको व अंबड भागासह परिसरात नागरिकांना वृत्तपत्र वाटप करण्याचे काम करणाºया विक्रेते याठिकाणी असतात. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने याचा त्रास नागरिकांसह वृत्तपत्र विक्रेत्यांनादेखील सहन करावा लागत आहे. सोमवारी सकाळीदेखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने विक्रेत्यांचे हाल झाले. महापालिकेने याठिकाणी साचत असलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सोय करण्याची करावी.
- दत्ता ठाकरे, अध्यक्ष, सिडको वृत्तपत्रविक्रेता संघटना