पंचवटीत विद्युत विभागाला साहित्याची प्रतिक्षा
By Admin | Updated: May 16, 2014 00:26 IST2014-05-16T00:14:07+5:302014-05-16T00:26:28+5:30
निष्काळजी : नागरीकांची ओरड अन् विद्युत विभागाची अडचण

पंचवटीत विद्युत विभागाला साहित्याची प्रतिक्षा
निष्काळजी : नागरीकांची ओरड अन् विद्युत विभागाची अडचण
पंचवटी : महापालिकेच्या पंचवटी विद्युत विभागात साहित्याची टंचाई निर्माण झाल्याने विद्युत विभागाला नागरीकांच्या तक्रारीला सामोरे जावे लागत आहे. प्रभागातील पथदीप बंद तसेच नादुरस्त असल्याबाबत नागरीकांनी तक्रारी केल्यानंतर विद्युत विभागाकडून तक्रारी सोडविण्यास विलंब होत असल्याने नागरीक आणि विद्युत विभागाच्या कर्मचार्यांत शाब्दीक चकमक होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेच्या पंचवटी विद्युत विभागाला विद्युत साहित्य वेळेवर मिळत नसल्याने तक्रारी सोडविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. दुरूस्तीसाठी लागणारे साहित्य येत असले तरी ते बोटावर मोजण्या इतकेच येत असल्याने तक्रारी कोणत्या भागातील सोडवायचा असा प्रश्न सध्या कर्मचार्यांना व अधिकार्यांना पडत आहे. विद्युत विभागाच्या तक्रारी दैनंदिन प्राप्त होत असल्या तरी साहित्य वेळेवर मिळत नसल्याने विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचारी हतबल झाले असतांनाच दुसरीकडे लोकप्रतिनिधी व नागरीक शाब्दीक हल्लाबोल करीत असल्याने विद्युत विभागाच्या कर्मचार्यांची कोंडी होत आहे. (वार्ताहर)
तक्रारी कागदावरच
विद्युत विभागाच्या तक्रारी करूनही केवळ विद्युत विभागाला साहित्य वेळेवर मिळत नसल्याने त्या वेळेत सुटत नाही. त्यातच नागरीक आणि लोकप्रतिनिधी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांची खरडपी करीत असल्याची चर्चा आहे. काही नागरीक तर आम्ही कर भरत नाही का असे म्हणून आम्हाला काही सांगू नका पहिले तक्रार सोडवा असे सांगून कर्मचार्यांची कोंडी करीत आहेत.