मुकणे पाणीयोजनेला निधीची प्रतीक्षा
By Admin | Updated: March 2, 2017 02:01 IST2017-03-02T02:00:58+5:302017-03-02T02:01:13+5:30
मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा करणाऱ्या २६६ कोटी रुपये खर्चाच्या योजनेला केंद्र सरकारकडून तिसरा व चौथा हप्ता मार्च २०१७ पूर्वीच मिळावा यासाठी महापालिकेने मंत्रालयाला प्रस्ताव पाठविलेला आहे.

मुकणे पाणीयोजनेला निधीची प्रतीक्षा
नाशिक : केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत मंजूर झालेल्या मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा करणाऱ्या २६६ कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्र सरकारकडून तिसरा व चौथा हप्ता मार्च २०१७ पूर्वीच मिळावा अन्यथा योजनेला अमृत योजनेंतर्गत मार्च २०१८ पर्यंत वर्षभराची मुदत वाढवून मिळावी, यासाठी नाशिक महापालिकेने सप्टेंबर २०१५ मध्येच शहरी विकास मंत्रालयाला प्रस्ताव पाठविलेला आहे. अद्याप त्याबाबत महापालिकेला प्रतिसाद मिळाला नसला तरी आता महापालिकेत भाजपा पूर्ण बहुमताने सत्तेवर आल्याने मुकणेच्या प्रलंबित निधीबाबत प्रशासनाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
केंद्र सरकारच्या नेहरू अभियानांतर्गत महापालिकेला मुकणे पाणीपुरवठा योजना राबविण्यास मंजुरी मिळाली आहे. मूळ २२० कोटी रुपयांची योजना विलंबामुळे २६६ कोटींवर जाऊन पोहोचली. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून ५० टक्के तर राज्य सरकारकडून २० टक्के निधी उपलब्ध होणार आहे. तर उर्वरित निधी महापालिकेला उभा करायचा आहे. सन २०१३ पासून मंजूर झालेल्या या योजनेच्या कामाला जानेवारी २०१६ मध्ये सुरुवात झाली.
तत्पूर्वी, केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू योजना गुंडाळल्याने आणि सदर योजनेचा कालावधी मार्च २०१७ पर्यंतच असल्याने नाशिक महापालिकेने २८ सप्टेंबर २०१५ रोजी केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाला प्रस्ताव पाठवून मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार, महापालिकेकडून पाठपुरावाही सुरू आहे. महापालिकेला या योजनेसाठी आतापर्यंत केंद्र व राज्याकडून पहिला हप्ता प्राप्त झालेला असून, दुसरा व तिसरा हप्ता मार्च २०१७ पूर्वी मिळण्याची अपेक्षा आहे. महापालिकेने एल अॅण्ट टी ला दिलेल्या कामाची मुदत जून २०१८ आहे, परंतु केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेल्या योजनेचा कालावधी मार्च २०१७ मध्ये संपुष्टात येणार असल्याने चौथ्या हप्त्याबाबत म्हणजेच सुमारे ३८ कोटी रुपयांबाबत अडचणी निर्माण होण्याची भीती महापालिकेला आहे. त्यामुळेच महापालिकेने राज्य शासनामार्फत केंद्राकडे निधीची मागणी केलेली आहे. परंतु, अद्याप त्याबाबत महापालिकेला प्रतिसाद मिळाला नसला तरी केंद्र स्तरावर त्याविषयी कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. आता महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने मुकणेच्या निधीचा प्रश्नही तातडीने मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)