रोजंदारी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात असंतोष : कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रोखले वेतन
By Admin | Updated: April 7, 2015 01:47 IST2015-04-07T01:46:40+5:302015-04-07T01:47:14+5:30
रोजंदारी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात असंतोष : कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रोखले वेतन

रोजंदारी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात असंतोष : कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रोखले वेतन
नाशिक : मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेणाऱ्या राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये आदिवासी विकास विभागाच्या एका आदेशानुसार पुन्हा नाराजी पसरली असून, लवकरच हे रोजंदारी कर्मचारी आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात असल्याचे संघटनेचे संदीप भाबड यांनी सांगितले. मागील महिन्यातच तीन आठवडे चाललेल्या या राज्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार उदयसिंग पाडवी यांनी आश्वासन दिल्यानंतर झाली होती. त्यावेळी लवकरच या कंत्राटी व तासिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार पाडवी यांनी आंदोलकांना सांगितले होते. प्रत्यक्षात आदिवासी विकास आयुक्तालयातील नाशिक प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या मुख्याध्यापकांची प्रकल्प अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्यांना १ एप्रिल २०१५ पासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन न काढण्याचे तोेंडी आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात रोजंदारी कर्मचाऱ्यांना गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून वेतनच नाही. एकीकडे मुख्यमंत्री कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन देत असताना दुसरीकडे विभागाचे अधिकारीच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन न काढण्याचे आदेश देत असल्याने कंत्राटी कर्मचारी व तासिका कर्मचारी यांच्यात असंतोष पसरला आहे. यासंदर्भात कंत्राटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आदिवासी विकास आयुक्त सोनाली पोंक्षे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही कंत्राटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी संदीप भाबड यांनी सांगितले.(प्रतिनिधी)