Wadala women sold in Madhya Pradesh | वडाळ्यातील युवतीची मध्य प्रदेशमध्ये विक्री
वडाळ्यातील युवतीची मध्य प्रदेशमध्ये विक्री

इंदिरानगर : वडाळागावातील एका नवविवाहितेला अजमेरला दर्शनासाठी जाण्याचा बहाणा करून तिच्या मामीनेच एका महिलेशी संगनमताने थेट मध्य प्रदेशमधील दलौदा येथे दीड लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. २३) उघडकीस आला. पीडित नवविवाहितेवर शारीरिक अत्याचार झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वडाळागावातील महेबूबनगरमध्ये राहणाऱ्या एका युवतीचा २२ मार्च रोजी राजस्थानमधील सिरोई जिल्ह्यातील एका युवकासोबत रीतसर विवाह झाला होता. विवाहानंतर रमजान पर्व सुरू झाले, त्यामुळे नवविवाहितेला आई व भाऊ माहेरी घेऊन आले. वडाळ्यात राहणाºया मामीच्या घरी पीडित नवविवाहिता ६ मे २०१९ रोजी भेटण्यासाठी गेली. त्यावेळी तिच्या घरात संशयित आरोपी महिला परवीन ऊर्फ राणी, शाहरूख ऊर्फ चेत्या हे बसलेले होते.
दरम्यान, अजमेरला दर्ग्यावर दर्शनासाठी जाऊ, असे मामीने पीडितेला सांगून विश्वास संपादन केला. ‘तुझा नवरा अजमेरला आलेला आहे. तू राणी व चेत्यासोबत दर्शनासाठी निघून जा आणि तेथून राजस्थानला नवºयासोबत तुझ्या सासरी जा, माझे तुझे मामा व आईसोबत बोलणे झाले आहे’ असे मामीने पीडितेला खोटे सांगितले.
७ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चेत्या, राणी या दोघांनी एका खासगी लक्झरी बसमध्ये पीडितेला बसवून थेट मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील जावरा तालुक्यात उतरविले. तेथे राणीने ‘येथे माझी बहीण राहते, तिला अजमेरला घेऊन जायचे आहे,’ असे सांगितले. त्यानंतर पीडितेला येथील एका खोलीत या दोघा संशयितांनी नेले आणि ‘तुला राजस्थानमध्ये दुसरे लग्न करावे लागेल, अन्यथा जिवे ठार मारू’ अशी धमकी देत मारहाण केली. संशयित चेत्याने विवाहितेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पीडितेने पोहोचून संशयितांविरुद्ध फिर्याद दिली आहे. तसेच संशयित मामीला पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित हेमंत व दलाल चेत्या ऊर्फ शाहरूख या दोघांनी मिळून पीडित युवतीवर मध्यप्रदेशच्या जावरा, बडवन येथे बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित चेत्या ऊर्फ शाहरूख, पीडितेची खरेदी करणारा संशयित हेमंत धाकड, परवीन ऊर्फ राणी, पीडितेची मामी या चौघांविरुद्ध अनुक्रमे बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.
या गंभीर गुन्ह्यात प्रथमदर्शनी पीडितेच्या मामीसह एक महिला व युवक संशयित आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मामीला ताब्यात घेतले आहे. तसेच पीडितेचे मोबाइलवरील कॉल (सीडीआर) तपासणी केली जात आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. महिला सुरक्षा विभागासह मानवी तस्करीविरोधी पथकदेखील याबाबत चौकशी करत आहे.
- पौर्णिमा चौगुले-श्रींगी, उपआयुक्त गुन्हे शाखा
मुलींच्या तस्करीचे रॅकेट ?
गोरगरीब कुटुंबाला मोठ्या रकमेचे आमिष दाखवून त्यांच्या मुलींची थेट विक्री करण्याचे रॅकेट यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अगोदरदेखील या भागातील दोन ते तीन मुलींची विक्री झाल्याची चर्चा गावात सुरू आहे. त्यामुळे पोलिसांपुढे आता हे रॅकेट शोधून त्याची पाळेमुळे उखडून फेकण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.


Web Title:  Wadala women sold in Madhya Pradesh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.