मालेगाव तालुक्यात मास्कविना मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 09:37 PM2021-01-15T21:37:02+5:302021-01-16T01:11:36+5:30

मालेगाव : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून घरात आणि गावात अडकून पडलेले ग्रामस्थ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. मात्र, अपवादवगळता कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क आढळून आला नाही. येसगावसह काही गावांमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.

Voting without mask in Malegaon taluka | मालेगाव तालुक्यात मास्कविना मतदान

मालेगाव तालुक्यात मास्कविना मतदान

googlenewsNext

मालेगाव तालुक्यातील अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या निमगाव येथे ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेच्या वेळी दोन्ही पॅनलचे गट समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी आपल्या फौजफाट्यासह निमगावसह येसगावी दाखल झाल्याने अनर्थ टळला.
तालुक्यातील चंदनपुरी येथे सकाळी आठ वाजेपासूनच मतदारांनी मतदानासाठी प्रचंड मोठी रांग लावली होती. येसगाव बुद्रुक येथे पंचायत समितीच्या माजी सभापती प्रतिभा सूर्यवंशी यांच्या वार्डात एकाच वाड्यातील भाऊबंद समोरासमोर आल्याने वाद निर्माण झाला होता. त्यात मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. रिक्षा भरून मतदारांना मतदान केंद्रावर मतदानासाठी आणले जात होते.
तालुक्यातील येसगाव बुद्रुक येथे तर मराठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ मतदान केंद्रावर उमेदवारांच्या समर्थक महिला ठाण मांडून बसल्या होत्या. येथे मात्र मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती. कोणत्याही गावात मतदान केंद्रावर शासनातर्फे सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. सर्वत्र मतदारांत उत्साह असताना भूतपाडे येथे मात्र शुकशुकाट दिसून आला. कार्यकर्ते मतदारांना घरातून अक्षरश: बोलावून आणत होते. छावणीचे पोलीस निरीक्षक वाडिले यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. दुपारी एक वाजता मेहुणे गावात मात्र दोन्ही पॅनलचे समर्थक रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत तालुक्यात ग्रामपंचायतींसाठी ४८.८२ टक्के मतदान झाले होते.

Web Title: Voting without mask in Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.