पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध
By Admin | Updated: May 21, 2014 00:38 IST2014-05-21T00:02:13+5:302014-05-21T00:38:12+5:30
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ आणि ६१ मध्ये होणार्या पोटनिवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये केवळ दुरुस्ती करण्यात येईल; परंतु नव्याने नाव समाविष्ट करणे किंवा भाग वाढविण्यासारखी कोणतीही कामे केली जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिद्ध
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ आणि ६१ मध्ये होणार्या पोटनिवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांमध्ये केवळ दुरुस्ती करण्यात येईल; परंतु नव्याने नाव समाविष्ट करणे किंवा भाग वाढविण्यासारखी कोणतीही कामे केली जाणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या दोन नगरसेवकांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यानुसार शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ६१ मधील नगरसेवक हेमंत गोडसे यांनी, तर कॉँग्रेसचे (आता बसपात प्रविष्ट झालेले) नगरसेवक दिनकर पाटील यांनीदेखील राजीनामा दिल्याने प्रभाग क्रमांक १७ मधील जागा रिक्त झाली. या दोन्ही प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. महापालिकेचे राजीव गांधी भवन, नाशिकरोड आणि सातपूर विभागीय कार्यालय आणि त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. २ मे २०१४ ही अंतिम अर्हता दिनांक असलेली यादी असून, त्यामुळे गेल्या मनपा निवडणुकीनंतर मतदार म्हणून नाव नोंदविणार्यांनादेखील संधी मिळणार आहे. या यादीत कोणतीही नवीन नावे वाढविणे किंवा कमी करणे आणि त्यामध्ये सुधारणा करण्याची निवडणूक आयोगाची अनुमती नाही. त्याचप्रमाणे मतदार यादीत नावे चुकली असल्यास ती दुरुस्त करता येतील किंवा विधानसभा मतदारसंघाच्या यादीत नावे असूनही प्रभागाच्या प्रारूप यादीत नसतील तर ती समाविष्ट करता येतील, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मतदारांना संबंधित विभागीय कार्यालयात २७ मेपर्यंत हरकती घेता येणार आहेत.