विठ्ठल नामाची शाळा भरली..!
By Admin | Updated: July 4, 2017 23:36 IST2017-07-04T23:34:59+5:302017-07-04T23:36:03+5:30
नाशिक : विठूनामाचा गजर करत जिल्ह्यात विविध ठिकाणी दिंड्या काढण्यात आल्या.

विठ्ठल नामाची शाळा भरली..!
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गळ्यात तुळशीमाळा, कपाळी चंदनाचा टिळा, हातात टाळ, डोक्यावर तुळस वृंदावन घेऊन वारकरी व विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेत विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. विठूनामाचा गजर करत जिल्ह्यात विविध ठिकाणी दिंड्या काढण्यात आल्या.
देवपूर विद्यालय
पाथरे : सिन्नर तालुक्यातील देवपूर विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली.
एकादशीनित्ति माजी विद्यार्थी व कीर्तनकार प्रसाद महाराज भागवत यांनी आषाढी एकादशी व वारीचे महत्त्व उदाहरणांसहित विशद केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अनेक भजने, अभंग गायली. काढण्यात आलेल्या दिंडीत जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी गावातील चौकात रिंगण करून भजने, फुगडीचा आनंद घेतला. गावातील अनेक महिलांनी या सोहळ्यात भाग घेऊन भजने गायली तसेच फुगडीही खेळली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बाबा भागवतांचे दर्शन घेतले. गळ्यात टाळ, मृदंग, वीणा, भगव्या पताका असा मुलांचा वारकरी पेहराव होता, तर विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन ‘रामकृष्ण हरी’चा जयघोष केला.
यावेळी विद्या साळुंखे, सुमन मुंगसे, वैशाली पाटील, ताराबाई व्यवहारे, सुनील पगार, भीमराव आढांगळे, बाळासाहेब कुमावत, नानासाहेब खुळे, श्रीहरी सैंद्रे, प्रमोद बधान, दत्तात्रय आदिक, मीननाथ जाधव, शंकर गुरुळे, राजेश आहेर, गणेश मालपाणी, रवि गडाख, सोपान गडाख, विलास पाटील, नारायण भालेराव, सतीश गायकवाड, अशोक कळंबे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
पाथरे हायस्कूल
माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित पाथरे हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी तसेच वृक्षलागवड सप्ताहांतर्गत वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.