विष्णूपुरीत १८ दलघमी पाणी
By Admin | Updated: May 27, 2014 01:02 IST2014-05-27T00:54:17+5:302014-05-27T01:02:39+5:30
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या १८ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला जुलै अखेरपर्यंत पाणी पुरणार आहे़

विष्णूपुरीत १८ दलघमी पाणी
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या १८ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला जुलै अखेरपर्यंत पाणी पुरणार आहे़ यंदा प्रकल्पातील मुबलक पाण्यामुळे नांदेडला पाणी टंचाईचा सामना करावा लागला नाही़ ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर अवकाळी पावसाने नद्या, नाल्यांना पाणी आले आहे़ त्यामुळे नांदेडकरांची तहान भागविणार्या विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीपातळी वाढली होती़ उन्हाळ्यात पाणीटंचाई होवू नये म्हणून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे वेगळे परिश्रम महापालिकेला घेण्याची वेळ आली नाही़ प्रकल्पातील मुबलक पाण्यामुळे नागरिकांचाही पाण्याचा प्रश्न संपला आहे़ अल्प पावसामुळे मागील दोन वर्षांपासून विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे़ ऐन उन्हाळ्यात दोन, तीन दिवसाआड पाणी सोडावे लागले़ त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला, असे म्हणण्याची वेळ येत असे़ यावर्षी पावसाने सरासरी ओलांडल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला़ उपलब्ध पाणी जून महिन्यापर्यंत पुरविण्यासाठी जानेवारीपासून एक दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे़ नांदेडकरांना उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये म्हणून दिग्रस बंधार्यातील आरक्षित पाण्याचे नियोजन करण्यात आले होते़ परंतु अवकाळी पावसाने प्रकल्पात चांगलीच वाढ केली़ १३ दलघमी पाणीसाठा वाढला होता़ १ मार्च रोजी विष्णूपुरी प्रकल्पात २३ दलघमी पाणीसाठा होता़ तर १४ मार्च रोजी प्रकल्पात ३६़५७ दलघमी साठा उपलब्ध होता़ तर २६ मे रोजी १८ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी) जिल्ह्यात १६ टँकरद्वारे ५ गावे अन् १४ वाडीतांड्यांना पाणी जिल्ह्यात आॅक्टोबर ते जून या कालावधीकरिता संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून या कृती आराखड्यानुसार १६ टँकरद्वारे ५ गावे आणि १४ वाडीतांड्यात पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी़ एच़ डाकोरे यांनी दिली़ जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९५५़५५ मिलीलिटर असून मागील वर्षी जिल्ह्यात ११४ टक्के पर्जन्यमान झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत नाही़ सध्या जिल्ह्यातील भोकर तालुक्यात १ टँकर, मुखेड-६, कंधार -५ तर लोहा तालुक्यात ४ टँकर सुरु आहेत़ त्याचप्रमाणे जिल्ह्यात १७५ खाजगी विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करुन १४० गावे व २५ तांड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ जिल्ह्यात ९३७ विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती मंजूर असून ४९६ ठिकाणीची विंधन विहिरीची दुरुस्ती करण्यात आली़ जिल्ह्यात ७३ नवीन विंधन विहिरी घेण्याच्या कामास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे़ त्यात नांदेड तालुक्यासाठी ७, मुदखेड ११, भोकर १२, हदगांव १७, बिलोली १२ तर किनवट तालुक्यात १४ विंधन विहिरींचा समावेश आहे़ तसेच १८१ नवीन विंधन विहिरींचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत़