पुण्यातील विनय फडणीस यांच्या पोलीस कोठडीत वाढ
By Admin | Updated: April 30, 2017 01:44 IST2017-04-30T01:44:49+5:302017-04-30T01:44:58+5:30
नाशिक : व्याजाचे आमीष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक विनय फडणीस यांच्याविरोधात तक्रारींचा ओघ वाढत आहे़

पुण्यातील विनय फडणीस यांच्या पोलीस कोठडीत वाढ
नाशिक : गुंतवणूकदारांना बँकेपेक्षा अधिक व्याजाचे आमीष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक घेत फसवणूक केल्याप्रकरणी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेले पुण्यातील नामांकित फडणीस ग्रुप अॅण्ड कंपनीज् व फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक विनय प्रभाकर फडणीस यांच्याविरोधात दिवसेंदिवस तक्रारींचा ओघ वाढत चालला असून, आतापर्यंत १०४ गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदविल्या आहेत़ दरम्यान, संचालक फडणीस यांची कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी (दि़२९) जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ बी़ भोस यांच्या न्यायालयात हजर केले असता २ मेपर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली आहे़
नाशिक शहरातील मुंबईनाका, इंदिरानगर, सरकारवाडा या पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक व एमपीआयडी कायद्यान्वये पाच गुन्हे दाखल आहेत़ आर्थिक गुन्हे शाखेने १९ एप्रिल रोजी मुंबईतील विक्रोळी येथून फडणीस यांना अटक केली होती़ त्यांना न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
या पोलीस कोठडीतील तपासात फडणीस यांच्या नावे दहाहून अधिक कंपन्या असल्याचे उघडकीस आले असून, त्यामधील दहा-बारा व्यक्तीच सर्व कंपन्यामध्ये संचालक आहेत़ तसेच या कंपनीच्या १७ एजंटही तपासात समोर आले आहे़ जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, या कंपनीने राज्यभरातील अनेक गुंतवणूकदारांना गंडा घातला असल्याने फडणीस ग्रुपचे आर्थिक व्यवहार तपासणे, एजंटमार्फत करण्यात आलेली गुंतवणुकीची माहिती घेणे, कंपनीच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या कॉम्प्युटरच्या क्लोनिंग करून माहिती संकलित करणे, संचालक अनुराधा विनय फडणीस, शरयू विनायक ठकार, भाग्यश्री गुरव, सायली फडणीस यांच्याकडेही तपास करणे यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली़ त्यानुसार २ मेपर्यंत पोलीस कोठडीत वाढविण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)