दुचाकी चोरट्याला ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले
By Admin | Updated: March 16, 2016 21:53 IST2016-03-16T21:52:04+5:302016-03-16T21:53:29+5:30
वावी : बनावट चावी वापरून दुचाकी पळविण्याचा प्रयत्न; अंधाराचा फायदा घेत दुसरा साथीदार फरार

दुचाकी चोरट्याला ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले
सिन्नर : बनावट चावी लावून रस्त्यावर उभी असलेली दुचाकी पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकी चोरला वावी ग्रामस्थांनी पाठलाग करून रंगेहात पकडले. चोरट्याचा दुसरा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. वावी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर वावी येथील संत शाहीर परशराम महाराज पतसंस्थेशेजारी दिलीप मंडलिक यांचे गॅरेज आहे. मंडलिक यांनी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गॅरेज बंद केले. त्यानंतर ते समोरच्या गाड्यावर अल्पोपाहार करीत होते. त्यांनी त्यांची पॅशन प्रो ही दुचाकी (क्र. एमएच १५ डीएन २५८५) जवळच सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील मिठसागरे चौफुलीवर उभी केली होती. यावेळी दोन चोरटे दुचाकीहून तेथे आले. त्यांनी त्यांच्याकडील बनावट चावीने क्षणार्धात मंडलिक यांची मोटारसायकल सुरू केली.
मंडलिक यांनी मोठमोठ्याने चोर.. चोरऽऽ आवाज दिल्यानंतर रोशन मंडलिक यांच्यासह तेथे उपस्थितीत असणाऱ्या युवकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्यास
प्रारंभ केला. चोरटे मिठसागरे रस्त्याने दुचाकी घेऊन पळाल्याने मंडलिक यांनी मिठसागरे रस्त्याला असणाऱ्या ताजणे मळ्यात फोन करून चोरटे या दिशेने पळत असल्याची माहिती दिली.
पाठलाग करणारे युवक जवळ आल्यानंतर त्यांनी दोन्ही मोटारसायकल सोडून पळ काढण्यास प्रयत्न केला. मात्र युवकांनी पाठलाग करून संशयित चोरटा भाऊसाहेब मारुती गांधडेरा (रा. खेडले, ता. निफाड) याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पोलिसांनी चोरट्यांच्या ताब्यातील सीडी डॉन मोटारसायकल (क्र. एमएच १५ एक्स १६४) जप्त केली आहे. संशयित चोरटा भाऊसाहेब गांधडेरा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)