ग्रामस्थांचा दारू अड्ड्यावर हल्लाबोल
By Admin | Updated: May 6, 2017 00:56 IST2017-05-06T00:56:40+5:302017-05-06T00:56:53+5:30
कंधाणे : ग्रामसभेच्या ठरावाला सर्वच विभागांनी केराची टोपली दाखविल्याने अखेर ग्रामस्थांनीच धडक देत हा दारू अड्डा उद्ध्वस्त केला.

ग्रामस्थांचा दारू अड्ड्यावर हल्लाबोल
लोकमत न्यूज नेटवर्क
कंधाणे : ग्रामसभेच्या ठरावाला सर्वच विभागांनी केराची टोपली दाखविल्याने अखेर ग्रामस्थांनीच धडक देत हा दारू अड्डा उद्ध्वस्त केला. या घटनेनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली.
बागलाण तालुक्यातील कंधाणे येथील गावठी दारूचा व्यवसाय बंद करण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेत करून तसे सटाणा पोलीस स्टेशन, तहसीलदार, राज्य उत्पादन विभागाला कळवूनही या अवैध गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. पण गेल्या चार ते पाच दिवसांपासून संबंधितांकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले गेल्याने येथील तरुणांनी एकत्र येत अवैध सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करत संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
सुरुवातीला दाद न देणारे पोलीस प्रशासन नागरिकांच्या दबावापुढे झुकले व घटनास्थळी भेट देत संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याचे आश्वासन देऊन त्यांनी तेथून काढता पाय घेतला.
येथे आदिवासी वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारूचा व्यवसाय चालतो. या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होते. या दारूमुळे अनेक नागरिक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. यात वापरण्यात येणारे रासायनिक घटक मानवी शरीरास अत्यंत घातक असून, त्यामुळे बऱ्यास नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना जीवघेण्या व्याधी लागल्या आहेत.
या व्यवसाय परिसरात नेहमी तळीरामांची वर्दळ राहत असल्याने परिसरातील नागरिकांना याचा उपद्रव सहन करावा लागत होता. गावात दि. १ मेच्या ग्रामसभेत गावतील अवैध गावठी दारूबंदीसाठी ठराव करण्यात येऊन, त्यासाठी कमिटीची स्थापना
करण्यात आली. याबाबतचा तपशील संबंधित विभागाला देऊन मदतीची मागणी करण्यात आली. ग्रामसभेत एकमुखी ठराव झाला. तरीही
संबंधित व्यवसायिकांनी आपली मुजोरी कायम ठेवत सर्रास व्यवसाय चालूच ठेवला. संबंधित पोलिसांना याबाबत माहिती दिली तरीही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
शेवटी ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीप्रमाणे येथील तरुणांनी सकाळी एकत्र येत संबंधित ठिकाणी छापा टाकत गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य उद्ध्वस्त केले. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासनाला विनंती केली.
सुरुवातीला फोनवर दाद न देणाऱ्या पोलीस प्रशासनाने नागरिक आंदोलनाच्या तयारीत असताना घटनास्थळी दाखल होत गुन्हे नोंदविण्याचे आश्वासन दिले व नागरिकांचा रोष शांत केला.