गावचे ‘पोलीस पाटील’ही झाले ‘स्मार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST2021-05-20T04:16:22+5:302021-05-20T04:16:22+5:30

गुगल मिटद्वारे संवाद: अधिकारी जाणून घेऊन लागले अडचणी सिन्नर : ग्रामीण पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ, कार्यक्षेत्राचे मोठे क्षेत्रफळ असल्याने येणाऱ्या ...

Village 'Police Patil' also became 'smart' | गावचे ‘पोलीस पाटील’ही झाले ‘स्मार्ट’

गावचे ‘पोलीस पाटील’ही झाले ‘स्मार्ट’

गुगल मिटद्वारे संवाद: अधिकारी जाणून घेऊन लागले अडचणी

सिन्नर : ग्रामीण पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ, कार्यक्षेत्राचे मोठे क्षेत्रफळ असल्याने येणाऱ्या मर्यादा, यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात भूमिका बजावणारे ‘पोलीस पाटील’ कालानुरूप बदलू लागले आहेत. अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांना ‘गुुगल मिट’ची लिंक दिल्यानंतर त्यांनी मिटिंगला जॉईन होत कोरोनाचे अपडेट देण्यासह अवैधधंद्यांची माहिती दिल्यानंतर अधिकाऱ्यानेही तात्काळ कारवाई करता आल्याचे उदाहरण वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिसून आले.

पूर्वी पोलीस पाटील म्हणजे अत्यल्प मानधनावर मोठी जबाबदारी असलेले गावातील भारदस्त व्यक्तिमत्त्व. गावात काही घटना घडल्यानंतर पोलीस पाटील पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जायची. त्यात बराच वेळेचा अपव्यय व्हायचा. अनेकदा तोपर्यंत गुन्हेगार फरार व्हायचे. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानाने व मोबाईलच्या जमान्यात पोलीस अधिकारी व पोलीस पाटील यांच्यात तात्काळ संपर्क होऊ लागला. आता तर पोलीस अधिकारी गावच्या पोलीस पाटलांसोबत ‘गुगल मिट’द्वारे संवाद साधण्यासह त्यांच्या समस्या जाणून घेण्यासह गावातील अवैध माहिती घेऊन तात्काळ कारवाई करीत असल्याने पोलीस पाटीलही ‘स्मार्ट’ झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कोरोनाच्या महामारीत पोलीस पाटलांना पोलीस ठाण्यात न बोलावता गुगल मिटद्वारे संवाद साधून अडीअडचणी जाणून घेण्याची सूचना केली होती. त्या आधारे वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी गुगल मिटद्वारे बैठक घेतली. या बैठकीत वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४४ गावांतील २५ पोलीस पाटलांनी हजेरी लावली.

---------------

प्रत्येक गावातील आढावा

प्रत्येक गावातील कोरोना रुग्णांचा आढावा घेतला. संस्थात्मक विलगीकरण, उपाययोजना यावर पोलीस पाटलांना माहिती दिली. यावेळी पोलीस पाटलांनी कोरोनाची माहिती देण्यासह गावातील अन्य उपयुक्त गोपनीय माहिती दिली. गुगल मिटची बैठक संपताच सहायक निरीक्षक कोते यांनी पथके तयार करून गुप्त माहितीदाराकडून अधिक माहिती जाणून घेत कारवाईस प्रारंभ केला.

-----------------------

‘जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांनी पोलीस पाटलांची गुगल मिटद्वारे बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासह त्यांच्या सूचना गांभीर्याने घेण्याचे आदेश दिले होते. त्याआधारे हद्दीतील पोलीस पाटलांनी गुगल मिटद्वारे बैठक घेतली. त्यांनी मांडलेल्या समस्या मांडल्या. गुप्त माहितीच्या आधारे माहिती जाणून घेत कारवाई केली जात आहे.

-सागर कोते, सहायक पोलीस निरीक्षक, वावी

---------------------------

‘वावी पोलीस ठाणे ते आमच्या गावाचे अंतर २६ किलोमीटर आहे. पोलिसांनी गुगल मिट बैठकीची सूचना दिली. त्यामुळे सर्व पोलीस पाटील वेळेवर बैठकीला ऑनलाईन आले. त्यामुळे आमचा वेळ वाचला. कोरोनाच्या काळात प्रवास टाळता आला. इंधनाची बचत झाली आणि अधिकाऱ्यांसोबत संवादही साधता आला.

प्रयागा जाधव, पोलीस पाटील, चास, ता. सिन्नर

Web Title: Village 'Police Patil' also became 'smart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.