महिला वनरक्षकाची सतर्कता; पालापाचोळ्याखाली दडवून होणाऱ्या खैराच्या तस्करीचा डाव उधळला
By अझहर शेख | Updated: May 15, 2024 18:13 IST2024-05-15T18:12:58+5:302024-05-15T18:13:21+5:30
वनविकास महामंडळाच्या वन प्रकल्प विभाग पश्चिम नाशिक मधील राखीव वनक्षेत्रातील खैर तस्करांना आळा घालण्यासाठी वन गस्ती पथक सक्रीय आहे.

महिला वनरक्षकाची सतर्कता; पालापाचोळ्याखाली दडवून होणाऱ्या खैराच्या तस्करीचा डाव उधळला
नाशिक : गुजरात सीमावर्ती भागातील पेठ वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या जंगलात घुसखोरी करून खैरासारख्या मौल्यवान प्रजातीची तोड करून लाकडाची तस्करी करणारा कुख्यात तस्कर विष्णू राऊत याने पुन्हा वनविकास महामंडळाच्या गस्ती पथकाला चकवा दिला; मात्र महिला वनरक्षकाच्या सतर्कतेमुळे आपट्याच्या पाळापाचोळ्याखाली दडवून पीकअप जीपमधून तोडलेल्या खैराची लाकडांच्या तस्करीचा डाव उधळून लावण्यास वन गस्ती पथकाला मंगळवारी (दि.१४) यश आले.
वनविकास महामंडळाच्या वन प्रकल्प विभाग पश्चिम नाशिक मधील राखीव वनक्षेत्रातील खैर तस्करांना आळा घालण्यासाठी वन गस्ती पथक सक्रीय आहे. पेठ तालुक्यातील महामंडळाच्या राखीव जंगलात मंगळवारी फिरते दक्षता पथक पेठ, आंबा, झरी भागात गस्तीवर होते. यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून फिरते वनपथक, एफडीसीएम झरी वनपथकांसह वनरक्षकांची दुचाकीवरून गस्त सुरू होती. यावेळी एक पीकअप जीप (एम.एच०४ सीपी १९६८) आपट्याच्या पाळापाचोळा घेऊन जाताना महिला वनरक्षक अनुराधा श्रीरामे यांना नजरेस पडली. त्यांनी ती अडविली असता चालकाने आपट्याची पाने घेऊन जात असल्याचे सांगितले. यावेळी श्रीरामे यांनी पाळापाचोळा उचकण्यासाठी पाठीमागे गेल्या तेव्हा संधी साधत चालकाने तेथून धूम ठोकली. पाळापाचोळ्याखाली तोडलेल्या खैराच्या झाडाचा बुंधा व मोठ्या फांद्यांचे सात नग आढळून आले. श्रीरामे यांनी त्वरित फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैय्या यांना ‘कॉल’ दिला. झरी वनपरिक्षेत्र अधिकारी बापू शेवाळे, वनपाल चेतन चौरे, माधुरी साळुंखे, कुंदन राठाेड, तारामती खिराडी, वाहनचालक डी.पी बोंबले आदींच्या पथकांची अतिरिक्त कुमक दाखल झाली. दोन्ही पथकांनी या भागातील रस्त्यांवर वेगवेगळ्या दिशेने गस्त करून शोध घेतला मात्र संशयित आरोपी विष्णू बन्सी राऊत (२९, रा.खिर्डी, ता.सुरगाणा) हा त्याच्या साथीदारासह पळून गेला. त्याच्याविरूद्ध तस्करीचे तीन वनगुन्हे दाखल असून वनविभागाच्या यादीवरील सराईत गुन्हेगारांपैकी एक आहे. प्रादेशिक वनविभागालाही तो तस्करीच्या गुन्ह्यात हवा आहे. विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजीत नेवसे, सहायक व्यवस्थापक धीरज परदेशी यांनी दिलेल्या सुचनांनूसार सीमावर्ती भागात तीन पथकांना अलर्ट देण्यात आला आहे. बलैया शेवाळे यांची पथके त्याच्या मागावर असल्याचे सुत्रांनी सांगितले.
२ लाखांचा मुद्देमाल जप्त
वनगुन्ह्याच्या या कारवाईत तोडलेल्या खैराचे सात नग मिळून एकुण ०.१६९घनमीटर लाकूड आणी जीप असा सुमारे २ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खैराची तस्करी लक्षात येऊ नये, यासाठी आपट्याच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्यांखाली लाकडे दडवून नेली जात होती.