VIDEO : मेरा शहंशाहे नासिक ऐसी शान वाला हैं... हुसेनी बाबा यांचा ३८८वा उरुस
By Admin | Updated: April 25, 2017 16:49 IST2017-04-25T15:37:20+5:302017-04-25T16:49:15+5:30
अझहर शेख / आॅनलाइन लोकमत, नाशिक : सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान म्हणून जुन्या नाशकातील हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांची ...

VIDEO : मेरा शहंशाहे नासिक ऐसी शान वाला हैं... हुसेनी बाबा यांचा ३८८वा उरुस
अझहर शेख / आॅनलाइन लोकमत, नाशिक : सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान म्हणून जुन्या नाशकातील हजरत सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांची बडी दर्गा ओळखली जाते. ‘शहंशाहे नासिक’ म्हणून प्रसिध्द असलेले हुसेनी बाबा यांचा वार्षिक यात्रोत्सव (उरूस) येत्या बुधवारपासून (दि.२५) सुरू होत आहे. यानिमित्त जुने नाशिकमधील बडी दर्गावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या आदेशान्वये १५६८ साली म्हणजेच ४४७ वर्षांपुर्वी हुसेनी बाबा मदिना शरीफ येथून नाशिकमध्ये आल्याचे बोलले जाते. त्यावेळी पिंजारघाट, जोगवाडा हा परिसर जादुगारांची वसाहत म्हणून ओळखला जात होता कारण या परिसरात जादुगारांचे वास्तव्य मोठ्या संख्येने होते, असे बुजुर्ग मंडळी आजही सांगतात. जादुगारांकडून येथील सर्वसामान्य गरीब कष्टकरी नागरिकांवर अत्याचार केला जात होता. त्यांच्या छळाला येथील नागरिक कंटाळले होते, अशी अख्यायिका आहे. तेव्हापासून या भागाला ‘जोगवाडा’ असे नाव पडले ते आजतागायत कायम आहे; मात्र आता या ठिकाणी नागरिक गुण्यगोविंदाने राहत आहे. हुसेनी बाबांच्या आगमणानंतर या परिसराचा कायापालट झाला. जादुगारांचे अस्तित्व बाबांनी आपल्या दैवी अध्यात्मिक ताकतीने (रूहानी) संपुष्टात आणल्याचे नागरिक सांगतात. तेव्हापासून आजतगायत बाबांच्या कृपाशिर्वादाने शहरात शांतता नांदत आली अूसन हजारो भाविक त्यांच्याशी जोडले गेले आहे.
बाबांकडे येणारे भाविक हे सर्वधर्मीय असल्यामुळे बाबांनी तेव्हापासूनच आपल्या शुध्द शाकाहाराचा स्विकार केला व आपल्या परिसरात देखील शाकाहार हाच महाप्रसाद असावा, अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हापासून आजही बाबांच्या बडी दर्गा परिसरात वांग्याची भाजी, खिचडी या खाद्यपदार्थाचा महाप्रसाद त्यांच्या भक्तांकडून वाटप केला जातो. ‘म्हणूनच एका प्रसिध्द कव्वालने नाशिकमध्ये जाहीर कव्वालीच्या मैफलित ‘मेरा शहंशाहे नासिक ऐसी शानवाला हैं...,’ ही कव्वाली सादर करून बांबाविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती.
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बडी दर्गा परिसरात बारा दिवसीय यात्रोत्सव (उरूस) साजरा केला जातो. दरम्यान, उरूसाच्या पहिल्या दिवशी सर्वप्रथम बाबांच्या मजारशरीफवर भद्रकाली पोलीस ठाण्याकडून मिरवणूकीद्वारे आणलेली चादर चढविली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळली जात आहे. पहिली चादर चढविण्याचा मान परिसराची सुरक्षा करणाऱ्या पोलीस प्रशासनाला विश्वस्त मंडळाकडून दिला जातो हे विशेष ! त्याचप्रमाणे संदल देखील साजरा के ला जातो. सर्वधर्मीय भाविक आजही मोठ्या श्रध्देने पिंजारघाटवरील बाबांच्या बडी दर्गाहमध्ये हजेरी लावतात.
बडी दर्गाहच्या बांधकामाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे दर्ग्याच्या आतील बाजूस असलेल्या काचेच्या कोरीव नक्षीकामवर कुराणामधील लिहिलेले श्लोक (आयत) होय. मोठ्या घुमटाच्या आतील बाजूने संपुर्ण उंचीपर्यंत काचेचे आकर्षक असे कोरीवकाम दर्ग्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे लक्ष वेधून घेते. दर्ग्याला दोन स्वतंत्र प्रवेशद्वार असून एक द्वार फक्त पुरूषांसाठी व दुसरे महिलांसाठी राखीव आहे. दर्ग्याच्या आवारात भक्तांना शुचिर्भूत (वजू) करण्यासाठी पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मैदानात बडी दर्ग्याच्या जुन्या कौलारू वास्तूच्या आकारामध्ये सिमेंट कॉँक्रीटची आकर्षक पाणपोई उभारण्यात आली आहे. ही पाणपोई जुन्या बडी दर्ग्याच्या वास्तूची आठवण करून देते. शहराच्या हिंदू, मुस्लीम, सीख, ईसाई धर्माच्या एकात्मतेचे प्रतिक म्हणून बडी दर्गा ओळखली जाते. यावर्षी नव्यानेच दर्ग्याच्या तीन घुमटापैकी सर्वात मोठ्या मध्यभागी असलेल्या घुमटावर ‘कलश’ बसविण्यात आला आहे. अजमेर येथील प्रसिध्द सुफी संत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती उर्फ गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर असलेल्या कलशाची ही प्रतिकृती असल्याचे विश्वस्त व बाबांचे वंशज हजरत हाजी वसीम पिरजादा यांनी सांगितले.