शिरसगाव ग्रामपंचायतीत युवाशक्तीचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:40 IST2021-01-21T20:25:38+5:302021-01-22T00:40:18+5:30
कोकणगांव : शिरसगांव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्व युवाशक्तीने विजय मिळवित विकासाच्या रखडलेल्या प्रश्नांबाबत मतदारांमध्ये जागृती निर्माण करून मातब्बरांना पराभवाची धूळ चारली. उमेश मोरे गटाने सात जागा जिंकून सत्ता काबीज केली. आता सरंपचपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याची उत्सुकता लागून आहे.

शिरसगाव ग्रामपंचायतीत युवाशक्तीचा विजय
युवाशक्ती पॅनलला गावकऱ्यांनी संधी दिली. संधीचे सोने व्हावे म्हणून गावामध्ये अधिक विकासकामे व्हावीत, रखडलेली कामे मार्गी लागावीत, या मुद्द्यांवरूनच गावकऱ्यांनी सत्ताधारी उमेदवारांऐवजी युवाशक्तीला साथ देऊन परिवर्तन घडवले. आता नवे कारभारी गावाच्या विकासाकडे आपले प्रयत्न कशा प्रकारे पणाला लावतात, याची गावकऱ्यांना उत्सुकता लागली आहे. निवडणुकीमधे आतापर्यंत फक्त दोनच सत्ताधारी गट होते. परंतु यावेळच्या निवडणुकीत उमेश मोरे, ॲड. श्रीराम भडांगे, लहू दगू मोरे, विलास भडांगे यांच्या नेतृत्वाखाली सर्व युवकांनी एकत्रित येऊन नवीन युवाशक्ती पनल तयार केले. युवाशक्ती पॅनलचे विजयी उमेदवार वार्ड नं. १ नंदा विश्वनाथ गवारे, गणपत भिका कराटे, वार्ड नं. २मध्ये रवींद्र रमेश शिरसाठ, शंकर काशिनाथ भडांगे व सुनीता भारत आरगडे आणि वार्ड नं. ३मध्ये उमेश वामनराव मोरे आणि जयश्री नामदेव मोरे हे सर्व उमेदवार निवडून आले.