येवला तालुक्यात पाणीटंचाईने बळीराजा हैराण
By Admin | Updated: January 7, 2016 23:29 IST2016-01-07T23:11:38+5:302016-01-07T23:29:07+5:30
येवला तालुक्यात पाणीटंचाईने बळीराजा हैराण

येवला तालुक्यात पाणीटंचाईने बळीराजा हैराण
अंदरसूल : येवला तालुका हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुष्काळी तालुका आहे. पालखेड डाव्या कालव्यामुळे काही भाग प्रासंगिक ओलिताखाली येत असला तरी सिंचनासाठी पाणीटंचाई कायम
आहे. तालुक्यात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांमुळे बऱ्याच गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही; मात्र वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. तालुक्याच्या पूर्वेकडील व उत्तर- पूर्व भागातील जवळपास सर्वच गावांना पाण्याची टंचाई जाणवत आहे.
अंदरसूल गावात सध्या चार दिवसांनंतर पाणी मिळत आहे. गावाच्या धनगर वस्ती, जयहिंद वाडीवरील वस्टे, औटे, मुंगसे, धनगे वस्ती, खैरनार वस्ती, मन्याड थडीवरील जहागीर वस्ती, सोनवणे वस्ती, गायकवाड वस्ती, ढोले वस्ती, भोसले वस्ती, कोल्हे वस्ती, देवरे वस्ती आदिंसह उत्तरेकडील घोडके, केरे, जाधव, देशमुख आदि सर्व वाड्यावस्त्यांवर पिण्यासाठी पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्याचप्रमाणे उंदीरवाडीचा काही भाग, बोकरे, दुगलगाव, देवळाणे, खामगाव, देवठाण, भुलेगाव, आडसरे गाव, खरवंडी, भारम, कोळम, गारखेडे, तळवाडे, पिंपळखुटे, न्याहरखेडे, पांजरवाडी, सायगाव, धामणगाव, नागडे, गवंडगाव रस्ते, सुरेगाव या सर्व गावांत सिंचनासाठी पाणी तर नाहीच; मात्र पिण्यासाठी व जनावरांना पाणी व चारा उपलब्ध करण्यासाठी जिवाचे रान करावे लागत आहे तरी ते मिळत नाही. पाऊस नसल्याने या भागातील शेतकऱ्यांनी धाडस करून लागण केली. त्यात उसनवारी, सोसायटी कर्ज घेऊन पिके घेण्याचा प्रयत्न केला; मात्र अपवाद वगळता सर्व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. अखेर जनावरांना किमान चारा तरी मिळेल याकरिता ज्वारी पीक घेण्याचा प्रयत्न केला
आहे. (वार्ताहर)
मुळातच पशुधन अल्प आहे, त्यांना जगविणेदेखील अवघड झाले आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. शेतीमाल नसल्याने बळीराजा दैनंदिन अडचणींना सामोरे जाऊन हतबल झाला आहे. येवला तालुक्याच्या बाहेरील कोपरगाव, वैजापूर, नांदगाव या भागातून सर्वाधिक कांदा मार्केटवर येत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती येवला व उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची विक्रमी आवक आहे. त्यामध्ये काही टक्के तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश असला तरी पूर्व भागातील व उत्तर पूर्व भागातील सिंचनासाठी तर नाहीच; मात्र वाड्यावस्त्यांवर शेतकरी व जनावरांना पाण्याची जानेवारी महिन्यातच टंचाई जाणवत आहे. तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी निव्वळ फार्स न करता सर्वांनी एकत्र येऊन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी निर्णायक भूमिका घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.