मनमाडच्या शेळके परिवाराला विठूरायाच्या वारीचा ‘ध्यास’!
By Admin | Updated: July 4, 2017 23:43 IST2017-07-04T22:58:06+5:302017-07-04T23:43:23+5:30
मनमाड : विठ्ठलाच्या भेटीची आस भोळ्याभाबड्या वारकरी भक्तांना थेट पंढरपूरकडे आकर्षित करत असते.

मनमाडच्या शेळके परिवाराला विठूरायाच्या वारीचा ‘ध्यास’!
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : विठ्ठलाच्या भेटीची आस भोळ्याभाबड्या वारकरी भक्तांना थेट पंढरपूरकडे आकर्षित करत असते. वर्षभरातून एकदा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे वारकरी अनेक असले, तरी मनमाड येथील शेळके दांपत्य मात्र महिन्याच्या प्रत्येक एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या पायी लीन होत असतात. त्यांच्या या भक्तिभावाला वंदन करण्यासाठी येथील नीलमणी गणेश मंदिर त्रस्टच्या वतीने त्यांच्या २१७ व्या वारीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायाचे आद्यदैवत पंढरपूरचे श्री विठ्ठल-रखुमाई यांची यात्रा भरते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेच्या या वारीमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. परंतु दरमहा वारी करणारे मनमाड शहरातील कलावती व सीताराम शेळके दांपत्य हे या वारकरी संप्रदायातील भक्तीने न्हाऊन निघालेले अनोखे वारकरी आहेत.
त्यानिमित्ताने येथील श्री नीलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने शेळके दांपत्याच्या श्रद्धेचा सन्मान करत ट्रस्टचे अध्यक्ष किशोर गुजराथी व प्रमुख विश्वस्त प्रज्ञेश खांदाट यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ट्रस्टचे विश्वस्त सचिव नितीन पांडे यांनी प्रास्ताविकात या सातत्यपूर्ण भक्तिमय दिंडीची माहिती सांगितली. चंद्रकात देवरे व शिवसेनेचे तालुका संघटक संतोष बळीद यांच्या हस्ते शेळके दांपत्यास ट्रस्टच्या वतीने श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रदान करण्यात आला.
यावेळी विश्वस्त गोविंद रसाळ, शेखर पांगुळ, भरत छाबडा, नीळकंठ त्रिभुवन, सुनील सानप, ओम बाविस्कर, दीपक शिंदे, राजेंद्र चंद्रात्रे, संदीप शिनकर, अक्षय सानप, रितीक चव्हाण, राजेंद्र ताथेड, राजाभाऊ कासार, प्रियेश चंद्रात्रे, विजय शेळके आदींसह गणेशभक्त व नागरिक उपस्थित होते. ट्रस्टचे विश्वस्त नितीन पांडे व किशोर गुजराथी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.