वाहने रस्त्यावरच उभी
By Admin | Updated: September 2, 2016 00:50 IST2016-09-02T00:50:07+5:302016-09-02T00:50:16+5:30
सार्थकनगर : अपघाताच्या पुनरावृत्तीची शक्यता

वाहने रस्त्यावरच उभी
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर बसथांब्यासमोर पालकवर्गाची आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. सेवाकुंज येथे झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती झाल्यावरच शहर वाहतूक पोलीस विभागाचे डोळे उघडणार आहेत का, असा उपरोधिक प्रश्न नागरिकांकडून करण्यात आला आहे.
वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगर, सराफनगर, पांडवनगरी, शरयूनगरी, समर्थनगर यांसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे बहुतेक नागरिक वडाळा-पाथर्डी रस्त्याचा वापर करतात. अंबड औद्योगिक वसाहत व देवळालीकॅम्पला हा जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. नागपूरच्या धर्तीवर रस्त्याचे काम झाल्याने वाहतूक सुरळीत होईल, असे वाटत होते. परंतु सार्थकनगर बसथांब्यासमोर एक प्राथमिक विद्यालय आहे. त्याठिकाणी सकाळी ८ वाजता आणि सकाळी ११ वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी येणाऱ्या पालकांच्या सुमारे ५0 ते ६0 दुचाकी आणि १0 ते १५ चारचाकी वाहने सर्रास वडाळा-पाथर्डी रस्त्यावरच लावली जातात. त्यामुळे सुमारे एक तास सदर रस्ता वाहतुकीस जणूकाही बंदच होतो. त्यामुळे मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिसरातील रहिवाशांनी अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही. तसेच लगतच असलेल्या अपार्टमेंट व सोसायटीतील रहिवाशांना आत-बाहेर जाणेसुद्धा मुश्कील होत आहे. (वार्ताहर)