नाशिकरोडला पुन्हा वाहनांची जाळपोळ
By Admin | Updated: April 19, 2016 00:14 IST2016-04-18T23:42:28+5:302016-04-19T00:14:57+5:30
आनंदनगर : मुक्तिधाम मागील सोसायटीतील प्रकार, मध्यरात्रीची घटना; समाजकंटकांचे कृत्य

नाशिकरोडला पुन्हा वाहनांची जाळपोळ
नाशिकरोड : आनंदनगर देवस्मृती सोसायटीत पार्किंगमध्ये असलेल्या चार मोटारसायकली रविवारी मध्यरात्री पेटवून दिल्याने त्या आगीत खाक झाल्या आहेत. यामुळे परिसरात दहशतीचे व घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मुक्तिधाम पाठीमागील आनंदनगर येथील देवस्मृती सोसायटीच्या पार्किंगमध्ये एक्सेस मोटारसायकल (एमएच १५, डीजे ६४०७), यामाहा मोटारसायकल (एमएच १५, डीटी ३०६५), स्कूटर (एमएच १५, एक्स १६४४) व कायनेटीक होंडा (एमएच १५, सीसी ७२४६) या रविवारी रात्री नेहमीप्रमाणे उभ्या करण्यात आलेल्या होत्या. रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने त्या चारही मोटारसायकलींवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्या. आग व धुरामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना पार्किंगमध्ये आग लागल्याचे लक्षात आले. आग कोणी लावली किंवा कशी लागली याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही. मात्र या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जळीतची नोंद घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)