भंडारदऱ्यात रंगला ‘वर्षा महोत्सव’; पर्यटकांना मेजवानी मोठ्या वीकेण्डमुळे अभयारण्यात गर्दी
By अझहर शेख | Updated: August 14, 2023 16:24 IST2023-08-14T16:24:14+5:302023-08-14T16:24:57+5:30
मोठ्या वीकेण्डची संधी साधत भंडारदरा येथे कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटन संचालनालयाने ‘वर्षा महोत्सव’ भरविला आहे. यामुळे शेकडो पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरत आहे.

भंडारदऱ्यात रंगला ‘वर्षा महोत्सव’; पर्यटकांना मेजवानी मोठ्या वीकेण्डमुळे अभयारण्यात गर्दी
नाशिक : कोवळा सुर्यप्रकाश पडत नाही, तोच पुन्हा आकाशी मेघांची गर्दी दाटून येते अन् वाऱ्याच्या वेगात कधी मध्यम तर कधी जोरदार सरींचा वर्षाव होतो. सर्वत्र दाटलेली हिरवळ अन् वाहणारे धबधबे अशा निसर्गरम्य वातावरणाचा पर्यटक आनंद घेत आहेत. मोठ्या वीकेण्डची संधी साधत भंडारदरा येथे कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटन संचालनालयाने ‘वर्षा महोत्सव’ भरविला आहे. यामुळे शेकडो पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरत आहे.
वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरील भंडारदरा येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटकांची मोठी गर्दी लोटली आहे. येथील विविध धबधबे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. शनिवारी (दि.१२) येथे पर्यटन संचालनालायकडून ‘वर्षा महोत्सव’ सुरू करण्यात आला. उदघाटनाची औपचारिकता पार पडली नसली तरीदेखील पाच दिवसीय महोत्सवाला जोरदार सुरूवात झाल्याचा दावा पर्यटन संचालनालयाने केला आहे. सोमवारपर्यंत (दि.१४) सुमारे ५०० पर्यटकांनी या महोत्सवाचा आनंद लुटल्याची माहिती नाशिक येथील पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक कार्यालयाने दिली आहे. या दोन दिवसांत आदिवासी कलावंतांनी नृत्याद्वारे लोककलेचे सादरीकरण पर्यटकांपुढे केले. तसेच घाटघर येथे वारली चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. वर्षा महोत्सवाची सांगता बुधवारी (दि.१६) बांबू वस्तू बनविण्याची कार्यशाळा,मनोरंजनात्मक कार्यक्रमासह उडदावणे येथे आदिवासी बोहाडा नृत्य अशा विविध कार्यक्रमांनी होणार आहे. समारोपप्रसंगी महोत्सवात सहभागी आदिवासी कलावंतांना सन्मानपत्राने गौरविण्यात येणार आहे.
विविध राज्यातील पर्यटकांचा सहभाग
‘फॅम टूर’द्वारे राज्यासह गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यातील पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले होते. या टूरने येथील विविध पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. न्हाणी धबधबा, नेकलेस फॉल, वसुंधरा फॉल, अमृतेश्वर मंदिर, घाटघर आदी ठिकाणी फेरफटका मारत निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला.
सांदण दरीत थरार...
येथील साम्रद गावात असलेल्या आशियामधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सांदण दरीत पर्यटकांनी सोमवारी (दि.१४) साहसी पर्यटनाचा थरार अनुभवला. यावेळी तरूणाईने ‘झिप लाइन’द्वारे दरी पार करण्याचा साहसी अनुभव घेतला.