त्र्यंबकेश्वरच्या आदिनाथ आखाड्यात विविध कार्यक्रम
By Admin | Updated: September 1, 2015 23:41 IST2015-09-01T23:41:48+5:302015-09-01T23:41:48+5:30
मूर्ती प्राणप्रतिष्ठा : उद्या कुशावर्तापर्यंत मिरवणूक

त्र्यंबकेश्वरच्या आदिनाथ आखाड्यात विविध कार्यक्रम
त्र्यंबकेश्वर : बिहारजवळील बक्सर येथील श्रीनाथ आश्रमाच्या वतीने त्र्यंबक येथे उभारण्यात आलेल्या श्री आदिनाथ आखाड्यात दि. ३ ते १३ सप्टेंबर या कालावधीत शोभायात्रा, अरणी मंथन, अग्निप्राकल्य, प्राणप्रतिष्ठा सोहळा, सामूहिक दीपदान महोत्सव, महामस्ताभिषेक, पूर्णाहूती, अवभृतस्थान आणि भंडारा आदि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आखाड्यात बांधण्यात आलेल्या भव्य मंदिरात ८४ नवनाथांच्या मूर्तींची, शंकर-पार्वती-गणपती, दुर्गादेवी यांसह विविध देवतांच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ३ सप्टेंबर रोजी स. ११ वा. आखाड्यातून कुशावर्त तीर्थावर सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन पाच कलशात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी, तर होमहवनासाठी १०८ कलशांद्वारे तीर्थ भरून आणले जाईल. त्र्यंबकेश्वर दर्शनाने मिरवणूकीस प्रारंभ होईल.
११ सप्टेंबर रोजी स. ७ ते सायं. ६ वाजेपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, तर १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आखाड्यात सहस्त्र दिवे पेटवून सामूहिक दीपदान होईल. १३ सप्टेंबर रोजी स. ९ वाजेपासून महामस्ताभिषेक, पूर्णाहूती, अवभृतस्थान,भंडारा आदि कार्यक्रम होतील.
कार्यक्रमासाठी बनारस येथील आदिनाथ पिठाधीश्वर त्रिलोकीनाथ महाराज, महामंडलेश्वर यागी श्रीनाथ महाराज, महामंडलेश्वर योगी हनुमाननाथ महाराज यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली १२५ बनारसी पंडित पौराहित्य करण्यासाठी येणार आहेत. आखाड्यात ११ कुंड बनविण्यात आले असून, ५० भाविक होमहवनासाठी बसणार आहेत. सिंहस्थ कालावधीत श्रीमद्भागवत सप्ताह, प्रवचन आदि कार्यक्रम होणार आहेत. याच कालावधीत मोफत आरोग्य तपासणी सेवा आणि अन्नछत्र चालविण्यात येणार आहे. मंदिरात स्थापित होणाऱ्या संगमरवरी मूर्ती खास जयपूर येथून बनवून आणण्यात आल्या असून, मंदिराचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. (वार्ताहर)