सिन्नर तालुक्यातील चास आश्रमशाळेत विविध उपक्रम :

By Admin | Updated: August 13, 2014 00:39 IST2014-08-12T22:07:03+5:302014-08-13T00:39:05+5:30

पारंपरिक चास आश्रमशाळेत आदिवासी दिन वेशभूषेत विद्यार्थ्यांची गावातून फेरी

Various activities in Chas Ashramshala in Sinnar taluka: | सिन्नर तालुक्यातील चास आश्रमशाळेत विविध उपक्रम :

सिन्नर तालुक्यातील चास आश्रमशाळेत विविध उपक्रम :

सिन्नर : तालुक्यातील चास येथील शासकीय आश्रमशाळेत जागतिक आदिवासी अस्मिता दिन उत्साहात पार पडला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी ढोल- ताशा व पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन गावातून प्रभातफेरी काढली. या मिरवणुकीत भागोजी नाईक, उमाजी नाईक, बिरसा मुंडा, महाराणी पद्मावती, राघोजी भांगरे, गुलब्या नाईक आदि क्रांतिकारकांच्या वेशभूषा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. यावेळी क्रांतिकारकांच्या दिलेल्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. गावातून ही प्रभातफेरी आश्रमशाळेच्या प्रांगणात आल्यावर मिरवणुकीची सांगता झाली. सखाराम भले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बंडूनाना भाबड, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन मेंगाळ, चासचे सरपंच हरिदास भालेराव, उपसरपंच रामदास भाबड, सिन्नर तालुका एकलव्य संघटनेचे अध्यक्ष विष्णू नाईक आदि उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बिरसा मुंडा, भागोजी नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी गीतमंचच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पारंपरिक वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
आदिवासी दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा, रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्यांना उघडे व बंडुनाना भाबड यांच्या नावाचे चषक प्रमाणपत्र देऊन येत्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मुख्याध्यापक एस. के. अहिरे यांनी स्वागत केले. पी. एस. मुंगसे यांनी प्रास्ताविक केले. संदीप भाबड यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमास नामदेव गांगड, आनंदा जाधव, बळवंता उघडे, एस. पी. पवार, पी. बी. शिंदे, एस. के. मनियार, श्रीमती एस. पी. पवार, श्रीमती ए. व्ही. भालेराव, श्रीमती एस. पी. आसलकर, एस. सी. मैद, श्रीमती जे. बी. सवने, श्रीमती नीता आव्हाड आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Various activities in Chas Ashramshala in Sinnar taluka: