वैष्णवांचा मेळा : भाविकांच्या मांदीयाळीने फुलला परिसरदातलीत रिंगण सोहळा

By Admin | Updated: June 14, 2017 00:11 IST2017-06-14T00:10:47+5:302017-06-14T00:11:17+5:30

वैष्णवांचा मेळा : भाविकांच्या मांदीयाळीने फुलला परिसरदातलीत रिंगण सोहळा

Vaishnavite fair: A Rishon Sutra in the surroundings of the devotees | वैष्णवांचा मेळा : भाविकांच्या मांदीयाळीने फुलला परिसरदातलीत रिंगण सोहळा

वैष्णवांचा मेळा : भाविकांच्या मांदीयाळीने फुलला परिसरदातलीत रिंगण सोहळा

शैलेश कर्पे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : माउली.. माउली.. असा आकाशाला गवसणी घालणारा आवाज, टाळ-मृदंगांचा दमदार ठेका, भगव्या पताकांनी केलेली दाटी, मुखी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा नामजप करीत उत्साहपूर्ण, भक्तिमय व भारावलेल्या वातावरणात संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज पालखीचा ‘रिंगण सोहळा’ सिन्नर तालुक्यातील दातली येथे पार पडला. नाशिक जिल्ह्यात झालेला रिंगण सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी वारकऱ्यांसह सुमारे ५० हजार वैष्णवांचा मेळा येथे भरला होता.
त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याचा सोमवारी रात्री लोणारवाडी येथे मुक्काम झाला. त्यानंतर मंगळवारी सकाळी सिन्नर शहरात पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाले. दुपारी कुंदेवाडी येथे भोजन झाल्यानंतर दातली शिवारात रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रिंगण सोहळ्यासाठी दातली शिवारात पालखी दुपारी ३ वाजता पोहचली.
पालखी रथातून काढताच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यासह मान्यवरांनी पूजन केले. पालखी तळावर येताच सर्व आसमंत माउलीमय होऊन गेला होता. रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी रांगोळी काढून फुलांचा सडा टाकण्यात आला
होता. सोहळ्यातील रिंगण पाहण्यासाठी परिसरातून भक्तीचा सागर लोटल्याचे चित्र होते. प्रत्येकजण हा क्षण आपल्या डोळ्यांत टिपण्यासाठी आतुर झाल्याचे दिसून येत होते.
दुपारी ४ वाजता पूर्ण रिंगण लावून झाल्यानंतर जरीपटका निशाणाने रिंगणाभोवती फेऱ्या मारल्यानंतर अश्व वायुवेगाने धावू लागताच भाविकांनी ‘माउली माउली’ नामाचा एकच गजर केला. टाळ्यांच्या कडकडाटात अश्वाने फेऱ्या पूर्ण केल्या. यावेळी वारकऱ्यांमधून टाळ-मृदंगांच्या निनादाने सारे आसमंत दुमदुमून गेले होते. पारणे फेडणारा हा क्षण उपस्थित भाविकांनी आपल्या डोळ्यांत साठवून ठेवला.
यावेळी पालखीमालक मोहन महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, महामंडलेश्वर
रामकृष्ण महाराज लहवीतकर, मोहन जाधव, संस्थानचे अध्यक्ष संजय धोंडगे, भगीरथ महाराज काळे, एकनाथ महाराज गोळेसर, पंडित महाराज कोल्हे, माधव महाराज पाटील, योगेश महाराज आव्हाड, एकनाथ भाबड, सागर महाराज
मुठाळ, त्र्यंबक महाराज गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित
होते.
संस्थानचे अध्यक्ष संजय धोंडगे यांनी रिंगण सोहळ्याचे सुयोग्य नियोजन केल्याबद्दल दातली ग्रामस्थांचे आभार मानले.

Web Title: Vaishnavite fair: A Rishon Sutra in the surroundings of the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.