प्रशासनाकडून दिलेल्या वेळा पाळणार : वैष्णवदास
By Admin | Updated: September 12, 2015 23:49 IST2015-09-12T23:48:45+5:302015-09-12T23:49:04+5:30
प्रशासनाकडून दिलेल्या वेळा पाळणार : वैष्णवदास

प्रशासनाकडून दिलेल्या वेळा पाळणार : वैष्णवदास
नाशिक : देशभरातून आलेल्या भाविकांना स्नानाचा लाभ मिळावा यासाठी शाही मिरवणूक व स्नानाच्या प्रशासनाकडून दिलेल्या वेळा पाळल्या जाणार असल्याचे दिगंबर अनी आखाड्याचे महामंत्री महंत वैष्णवदास यांनी सांगितले. साधू-महंतांच्या शाहीस्नानानंतर प्रसाद म्हणून भाविक स्नान करणार आहेत. त्यामुळे त्यांना स्नानासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे. मागील पर्वणीपेक्षा भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे दिवसभरात भाविकांना स्नानाची संधी मिळणे आवश्यक आहे.
गत पर्वणी काळात बसेस बंद करण्यात आल्या होत्या; मात्र रविवारी होणाऱ्या दुसऱ्या पर्वणीसाठी बसेस सुरू आहेत. त्यामुळे भाविकांची पायपीट कमी होणार आहे. श्रावण अमावास्या असल्याने भाविकांची शाहीस्नानासाठी गर्दी वाढणार आहे. तसेच साधूंची संख्या वाढणार आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकाला स्नान करणे सोयीचे व्हावे यासाठी नियोजित वेळेत शाही मिरवणूक आणि स्नानाचा प्रयत्न असणार आहे. पहिल्या शाही पर्वणीनुसार परंपरेप्रमाणे आरती, पूजा होऊन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. हत्ती, घोड्यांना मिरवणुकीत मनाई करण्यात आली आहे.
देशभरातून विविध राज्यांतून भाविक शाहीस्नानासाठी दाखल होणार असल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून दिलेल्या वेळेत आखाड्यासह खालशांचे शाहीस्नान व मिरवणूक पार पडणार आहे. दिगंबर अनी आखाड्याचे खालशे जास्त असूनही वेळेबाबत कुठलीही तडजोड होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)