वडनेरभैरवच्या विद्यार्थिनींची बस फी भरली ग्रामपंचायतीने !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 17:27 IST2019-12-19T17:27:04+5:302019-12-19T17:27:55+5:30
वडनेरभैरव : एकीकडे मुलींच्या मोफत शिक्षणासाठी राज्य शासन विविध उपाय योजत असताना आपल्या हद्दीतील महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या बस प्रवासाची फी भरण्यासाठी येथील ग्रमापंचायत पुढे सरसावली आहे. दरम्यान, प्रवासाच्या रकमेचा पहिला हप्ता धनादेशाद्वारे महाविद्यालयाकडे सूपूर्द करण्यात आला असून या अभिनव उपक्रमाबद्दल सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे पालकवर्गाकडून कौतुक केले जात आहे.

वडनेरभैरवच्या विद्यार्थिनींची बस फी भरली ग्रामपंचायतीने !
चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव ग्रामपंचायतीच्या वतीने येथील मविप्र संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात मुलींसाठी नुकताच एक गुड न्यूज अनाऊन्समेंट कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी मविप्र संचालक व माजी आमदार उत्तम भालेराव तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शांताबाई बेंडके, उपसरपंच रावसाहेब भालेराव, शालेय समिती अध्यक्ष दिलीपराव धारराव, हिरामण शिंदे उपस्थित होते. वडनेरभैरव ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या सर्व विद्यार्थिनींची महाविद्यालयात येण्या -जाण्यासाठी लागणारी बस फी यापुढे वडनेरभैरव ग्रामपंचायत भरणार असून त्याचा प्रथम हप्ता धनादेश स्वरूपात देत असल्याची घोषणा उपसरपंच रावसाहेब भालेराव यांनी केली. गावातील कोणत्याही मुलीचे शिक्षण पैशांअभावी थांबू नये यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला हा स्तुत्य निर्णय आहे. पाप पुण्यावर माझा विश्वास नसून समाजाच्या , गरजवंतांच्या कामी येण्यातच खरे समाधान असते यावर माझी ठाम निष्ठा आहे. ग्रामपंचायतीने मुलींच्या प्रवास खर्चाचा संपूर्ण वाटा उचलून अन्य गावांपुढे आदर्श उभा केला आहे, अशा शब्दात उत्तम भालेराव यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले. मुलींची बस फी भरून ग्रामपंचायतीने चांगला आदर्श घालून दिला, असे मत धारराव यांनी व्यक्त केले. गावातील सर्व मुलींची बस फी भरण्याची ही योजना राज्यातील पहिलीच असून वडनेरभैरव ग्रामपंचायत यापुढे नियमितपणे यासाठीच्या निधीची तरतूद करणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी रोशन सूर्यवंशी यांनी सांगीतले. प्राचार्य ए. एल. भगत यांच्यासह विद्यार्थिनींच्या वतीने अनुष्का पाचोरकर हिने ग्रामपंचायत कार्यकारिणीचे आभार मानले. याप्रसंगी सुभाष पुरकर, ग्रामपंचायत सदस्य सर्व अविनाश खिराडकर, बाळासाहेब वाघ, अनिल शिंदे, योगेश साळुंके, नानासाहेब वाघ, अमोल गचाले, शंकर राऊत, मांजबाई निमकर, शोभाताई मोरे, पठाणताई, मनीषाताई पगार, सुमनताई पवार, मीनाताई हिंगे, बस्ते, दत्तात्रेय माळी, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर सेवक तसेच वडनेर, खंडाळवाडी परिसरातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रा. ज्ञानेश्वर भगुरे यांनी सूत्रसंचालन केले.