मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनाही लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:49+5:302021-05-08T04:14:49+5:30
नाशिक रोड : येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचेही लसीकरण सुरु झाले असून, आतापर्यंत ९७ कैद्यांना महापालिकेच्या सिन्नर फाटा येथील ...

मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनाही लसीकरण
नाशिक रोड : येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचेही लसीकरण सुरु झाले असून, आतापर्यंत ९७ कैद्यांना महापालिकेच्या सिन्नर फाटा येथील लसीकरण केंद्रात कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.
नाशिक रोड येथील कारागृहातील सर्व २,४०० कैद्यांना लस देण्यासाठी कारागृहातच लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी आणि महापालिका कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती कारागृहाच्या सुत्रांनी दिली. कारागृहात एकूण २,४०० कच्चे व पक्के कैदी आहेत. त्यांना कोरोना होऊ नये म्हणून लसीकरण करणे गरजेचे आहे. मात्र, एवढ्या कैद्यांना कारागृहाबाहेर शासकीय अथवा खासगी केंद्रावर लसीकरणासाठी नेणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. तसेच कैद्यांची ने-आण करणेही अवघड आहे. त्यामुळे कारागृहातच लसीकरण केंद्र सुरु करुन लस देण्याचे नियोजन कारागृह प्रशासनाने केले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, सध्या सर्वच ठिकाणी लसीची टंचाई आहे. पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर कारागृहातील केंद्रासाठी लस मिळणार आहे. ती मिळताच सर्वच वयोगटातील कैद्यांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती कारागृहातील सुत्रांनी दिली . दरम्यान, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ अधिकारी अशोक कारकार यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय नियमांचे पालन करत कारागृहातील कैद्यांचे लसीकरण होत आहे.
इन्फो-
नव्या कैद्यांची कोरोना चाचणी
सध्या कोरोना रोखण्यासाठी कैद्यांना थेट कारागृहात प्रवेश न देता, के. एन. केला शाळेतील तात्पुरत्या जेलमध्ये ठेवण्यात येत आहे. तेथेही लसीकरण केले जाणार आहे. प्रत्येक नव्या कैद्याची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना, शासकीय व न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे.