सातपूरला ३१ हजार नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:15 IST2021-05-18T04:15:21+5:302021-05-18T04:15:21+5:30
केंद्र आणि राज्य सरकारने देशात दि. १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास मंजुरी दिल्यानंतर सुरुवातीला फक्त कोरोना वाॅरिअर्स (फ्रंटलाईन ...

सातपूरला ३१ हजार नागरिकांचे लसीकरण
केंद्र आणि राज्य सरकारने देशात दि. १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास मंजुरी दिल्यानंतर सुरुवातीला फक्त कोरोना वाॅरिअर्स (फ्रंटलाईन वर्कर्स) आणि ६० वर्षे वयावरील नागरिकांनाच देण्यात आली होती. त्यानंतर ४५ वर्षे वयावरील नागरिकांना देण्यात आली, आणि आता दि. १ मेपासून १८ ते ४४ वय असलेल्या युवकांना सुरू केली आहे. लस घेण्यासाठी झुंबड उडत असल्याने १८ ते ४४ वयोगटासाठी बंद करण्यात आली असून, ४५ वयोगटासाठी नियमात बदल करण्यात आले आहेत. नाशिक शहरात सुरुवातीला मध्यवर्ती ठिकाणीच लस दिली जात होती. नंतर उपनगरांमध्ये केंद्र सुरू करण्यात आले. सातपूर विभागासाठी सर्वप्रथम मनपाच्या मायको हॉस्पिटल आणि ईएसआय रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एमएचबी कॉलनीतील मनपा रुग्णालय, गंगापूर गावातील मनपा रुग्णालय आणि संजीवनगर येथेही लसीकरण केंद्राची सोय करण्यात आली आहे.
सातपूर विभागातील सर्वाधिक लस ईएसआय रुग्णालयात दिली गेली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण क्षमतेने ही मोहीम सुरू आहे, तर ज्येष्ठ परिचारिका मेरी कोलूर यांच्या नेतृत्वाखाली मायको हॉस्पिटल आणि संजीवनगर येथे मोहीम राबविण्यात येत आहे. गंगापूर गावात डॉ. योगेश कोशिरे आणि एमएचबी कॉलनीतील मनपा रुग्णालयात डॉ. क्षिप्रा नेतृत्व करीत आहेत. या पाचही केंद्रांवर दि. १५ मेपर्यंत ३१ हजार ४५९ नागरिकांना लसीचे डोस देऊन आघाडी घेतली आहे. तरी बहुतांश वेळा या केंद्रांना अपेक्षित लसीचा पुरवठा करण्यात आलेला नाही.