शाळा दुरुस्तीचा निधी शाळांनाच वापरा
By Admin | Updated: November 19, 2014 01:10 IST2014-11-19T01:10:12+5:302014-11-19T01:10:28+5:30
रस्ते दुरुस्ती कामांच्या मान्यता रोखण्याचा ठराव

शाळा दुरुस्तीचा निधी शाळांनाच वापरा
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेसमधील शाळा दुरुस्तीसाठी वापरायचा निधी परस्पर ठरावाद्वारे रस्ते दुरुस्तीकडे वळविण्याच्या प्रयत्नांना स्थायी समिती सदस्यांनी ब्रेक लावला असून, या रस्ते दुरुस्तीच्या कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश रद्द करण्याचा ठराव स्थायी समितीत एकमताने मंजूर करण्यात आला. स्थायी समितीच्या बैठकीत सदस्य प्रा. अनिल पाटील यांनी हा विषय मांडला. शाळा दुरुस्तीसाठी धरण्यात आलेला सुमारे ७५ लाखांचा निधी परस्पर रस्ते दुरुस्तीवर का वळविला, असे त्यांनी विचारले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र महाले यांनी तसा २२ जुलैच्या सर्वसाधारण सभेत ठराव संमत झाल्याचे सांगितले; मात्र प्रा. अनिल पाटील व गोरख बोडके यांनी असा कोणताही ठराव झालेला नसल्याचे सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांना उद्देशून रवींद्र देवरे यांनी, जी चर्चा झाली त्यानुसारच ठरावांचा इतिवृत्तात समावेश करा, अशी खोचक टीका केली, तर इतिवृत्त आपण नव्हे, तर अध्यक्ष अंतिम करतात, असे माळोदे यांनी सांगताच अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी, आपल्या काळात असा कोणताही प्रकार झालेला नाही आणि पुढे भविष्यात असा प्रकार होणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे शाळा दुरुस्तीसाठी धरलेला ७५ लाखांचा निधी, पर्यावरण विभागातून प्राप्त झालेला व सौर पथदीपांसाठी आलेला ८० लाखांचा निधी हे निधी शाळा दुरुस्तीसाठीच ठेवावा. तसेच शाळा दुरुस्तीसाठी धरलेला निधी रस्ते दुरुस्तीसाठी वळविण्यास दिलेली प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश रद्द करावेत, असा ठराव गोरख बोडके यांनी मांडला. तो संमत करण्यात आला. मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील सावळ्या गोेंधळाबाबत सदस्य बाळासाहेब गुंड यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. (प्रतिनिधी)