दिंडोरीतील प्रगतिशील शेतकऱ्यांचा प्रयोग
By Admin | Updated: December 19, 2014 23:43 IST2014-12-19T23:36:25+5:302014-12-19T23:43:29+5:30
प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रयोग राज्यभर राबविणार

दिंडोरीतील प्रगतिशील शेतकऱ्यांचा प्रयोग
दिंडोरी तालुका हा प्रयोगशील तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला असून, शासनाने विविध योजना राबविताना दिंडोरीला प्राधान्य दिले आहे. गारपीट, बेमोसमी पावसाच्या दीर्घकालीन उपाययोजनेतही तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेला प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रयोग राज्यभर राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दिंडोरी तालुक्यातील डोंगरदऱ्यात फुले-फळे द्राक्षाची लागवड करत येथील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने प्रगती केली आहे. पॉलिहाऊस शेड नेट आदि विविध प्रयोग राबविले आहे. गेल्या चार-पाच वर्षापासून सातत्याने होणारा हवामानातील बदल अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या विकासाला बाधा आणली आहे. गेल्या वर्षी बेमोसमी पाऊस व थंडीने अनेक निर्यातक्षम द्राक्षबागांना मोठा फटका बसल्याने निर्यातदार द्राक्ष बागाईतदारांचे लाखोंचे नुकसान झाले होते. या नुकसानीची झळ खाल्लेल्या शेतकऱ्यांनी ज्या देशांमध्ये बारमाही पाऊस पडूनही तेथील शेतकरी कसे शेती करतात याची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळविली. काहींनी
थेट त्या देशातील बागांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली.
मातेरेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी सदाशिव शेळके यांनी तर दहा वर्षांपूर्वीचा प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रयोग केला होता मात्र सदर कागद योग्य पद्धतीचा नसल्याने सूर्यप्रकाश मिळण्यात हवा खेळती राहण्यात अडचणी निर्माण होऊन हा प्रयोग काहीसा असफल झाला होता. मात्र त्यांनी नवनवीन प्रयोग सुरूच ठेवला होता. त्यांनी त्यांचे बागेवर शेडनेट टाकत बागेचा बचाव केला आहे.यामुळे केवळ थंडी वारा ऊन याचेपासून बचाव झाला मात्र बेमोसमी पावसाचा फटका बसत आहे. त्यावर पॉलिपेपर आच्छादन हा पर्याय असून, शेळके यांनी इस्राईल, इटली, स्पेनचा दौरा करत या प्रयोगाचा अभ्यास केला .इटली व स्पेन मध्ये खाण्याच्या द्राक्षबागा या १०० टक्के पॉलिआच्छादन असलेल्या आहेत, तर फक्त वाइनच्या बागा खुल्या आहेत. पॉलिआच्छादनाममुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होत कमी औषधे फवारणी करावी लागत असून, चांगल्या प्रतीचे द्राक्ष उत्पादन होतो. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी हा प्रयोग राबविला असून, सोनजांब येथील युवा प्रगतिशील शेतकरी शैलेश जाधव यांनी हा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला यंदा त्यांचे बागेवर त्यांनी ८० टक्के हे पॉलिथिन पेपरचे आच्छादन दिले झालेल्या गारपिटीमध्ये तेवढ्या बागेचे काहीही नुकसान झाले नाही तर उर्वरित २० टक्के बागेचे नुकसान झाले.
हा गारपीट व अवकाळी पावसावर दीर्घकालीन उपाय असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या बागेस भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या शेतकऱ्यांनी तसेच द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी मुख्यमंत्री फडवणीस यांना हा प्रयोग राबविताना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. मुख्यमंत्री यांनीही याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवत सदर योजना अंबलबजावणीसाठी शासन पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहे .
फोटो - मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस शेतकर्यांशी चर्चा करताना