रुग्णवाहिका नसल्यास खासगी वाहनांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST2021-09-02T04:30:59+5:302021-09-02T04:30:59+5:30
मंगळवारी (दि. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयात सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन त्यात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ...

रुग्णवाहिका नसल्यास खासगी वाहनांचा वापर
मंगळवारी (दि. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयात सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन त्यात अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील आदिवासी भागातील बालमृत्यू व मातामृत्यू टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कुपोषण कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या अन्नपदार्थांचा वापर करण्याचा तसेच जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेल्या एक मूठ पोषण कार्यक्रमांतर्गत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची तपासणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या शाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवसंजीवनी अंतर्गत मानसेवी भरारी पथकाची रिक्त पदे भरण्याच्या कारवाईबाबत आढावाही घेण्यात आला. खाजगी हॉस्पिटलमधील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णालयांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या मानांकनाची पूर्तता केलेल्यांना सभेत मान्यता देण्यात आली.
जिल्हा गुणवत्ता समितीच्या बैठकीत स्वच्छता, संसर्ग नियंत्रणासाठी ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छतेविषयी व गुणवत्तापूर्वक रुग्णसेवा देण्याबाबत जास्तीत जास्त भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. कायाकल्प व नॅशनल क्वॉलिटी अशुरन्स स्टॅण्डर्ड हे दोन्ही कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र, तसेच ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात राबविण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. रवींद्र चौधरी, डॉ. प्रशांत खैरे, डॉ. सायली ठोकळ, स्वाती मेतकर आदी उपस्थित होते.