चुका सुधारल्याने पर्वणी सुकर
By Admin | Updated: September 13, 2015 21:57 IST2015-09-13T21:56:01+5:302015-09-13T21:57:30+5:30
गिरीश महाजन : बंदोबस्त तेवढाच; पण धोरणात बदल

चुका सुधारल्याने पर्वणी सुकर
नाशिक : अधिकाऱ्यांकडून चुका होतात, अनुभवातूनच माणसे शिकतात. त्याप्रमाणे गेल्या वेळच्या पर्वणीत झालेल्या चुका सुधारल्याने कुंभमेळ्याची द्वितीय स्नानपर्वणी भाविक व नाशिककरांसाठी सुकर झाल्याचा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना केला. पोलिसांचा बंदोबस्त न घटवता धोरणात बदल केल्याने हे घडू शकल्याचेही ते म्हणाले.
कुंभमेळ्याच्या द्वितीय पर्वणीनिमित्त सकाळी त्र्यंबकेश्वरहून नाशिकच्या रामकुंडावर दाखल झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, या पर्वणीला लोकांना अधिक प्राधान्य व स्वातंत्र्य देण्याचा विचार करण्यात आला. गेल्या पर्वणीत बंदोबस्ताचे नियोजन चुकल्यानंतर तातडीने दुसऱ्या दिवशी बैठक घेतली. त्यात भाविकांना स्नानासाठी अर्धा ते एक किलोमीटरच चालावे लागेल, या दृष्टीने नियोजन करण्यात आले. शहरातील बॅरिकेडिंग कमी करण्यात आले. गेल्या वेळी साधूंच्या आखाड्यांचे स्नान होईपर्यंत भाविकांना गोदाघाटावर प्रवेश देण्यात आला नव्हता. यंदा मात्र गोदाघाटाचा गौरी पटांगण, रोकडोबा पटांगण, यशवंतराव महाराज पटांगण, गांधी तलाव हा भाग शाहीस्नानापूर्वीच भाविकांना स्नानासाठी खुला करून देण्यात आला. त्यामुळे पहाटेपासूनच भाविकांना पर्वणी साधता आली. याशिवाय शाही मिरवणूकही भाविकांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली. या मार्गावरील निर्बंध घटवण्यात आले. गेल्या पर्वणीत पंधरा हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळीही पोलिसांचे संख्याबळ तेवढेच ठेवण्यात आले असून, सुरक्षेत तडजोड करण्यात आली नाही; मात्र धोरणात काही बदल करण्यात आले. पिठोरी अमावास्येमुळे यावेळी पर्वणीसह ७२ तासांचा स्नानाचा मुहूर्त होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून रविवारी सकाळपर्यंत नाशिकमध्ये सुमारे पंधरा लाख भाविकांनी स्नान केल्याचेही महाजन म्हणाले. (प्रतिनिधी)