आगामी पर्वणी सुसह्य होईल !
By Admin | Updated: September 2, 2015 23:21 IST2015-09-02T23:20:31+5:302015-09-02T23:21:16+5:30
कुशवाह यांचा आत्मविश्वास : फेरनियोजनाची तयारी

आगामी पर्वणी सुसह्य होईल !
नाशिक : सिंंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीला भाविकांनी पाठ फिरवली असली तरी, दुसऱ्या पर्वणीला देशभरातून भाविक येतील, त्याचबरोबर शहरातील नागरिकांनाही पर्वणीच्या दिवशी स्नान करता यावे यासाठी सुसह्य पद्धतीने फेर नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंदसिंह कुशवाह यांनी दिली.
पहिल्या पर्वणीचे नियोजन का व कसे फसले, भाविक का आले नाहीत यावर आता चर्चा करण्यापेक्षा दुसऱ्या पर्वणीच्या नियोजनाची तयारी केली जात असून, त्यासाठी पहिल्या पर्वणीत झालेल्या त्रुटी लक्षात घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. त्र्यंबकेवर येथे जाऊ पाहणाऱ्या भाविकांसाठी नाशिकमधून फक्त मेळा बसस्थानकावरच सुविधा करण्यात आली होती व त्याला मर्यादा होती हे पाहून आता त्र्यंबक मेळा स्टॅण्ड, सातपूर, ठक्कर बजार, डोंगरे मैदान आदि ठिकाणांहून भाविकांसाठी सोय करण्यात येणार आहे, त्याच बरोबर शहरांतर्गत रस्ता वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबतही प्रयत्न असणार असल्याचे कुशवाह यांनी सांगितले. आगामी पर्वणीसाठी मोठ्या संख्येने भाविक येतील, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.
नाशिकच्या अधिकाऱ्यांनी परराज्यात जाऊन तेथील जनतेला नाशिकला येण्यासाठी कोणते मार्ग आहेत याची माहिती देण्यात आली, पर्वणीच्या दिवशी येऊ नये असा प्रचार करण्यात आला नसल्याचेही ते म्हणाले.
स्वामी स्वरूपानंद शंकराचार्य यांनी त्र्यंबकेश्वरला स्नानासाठी स्वतंत्र वेळ मागितला होता परंतु प्रशासनाचा संबंध फक्त आखाड्यांच्या वेळांबाबत होता व तशी स्पष्ट कल्पनाही त्यांना देण्यात आली होती, त्यामुळे आखाड्यांची वेळ सोडून त्यांनी कधीही स्नान करायला आमची काही हरकत नव्हती, असेही कुशवाह यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पुष्कर मेळा भरणाऱ्या राजमुंद्री येथील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार सोहळ्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्याच्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पहिल्या पर्वणीला भाविक कमी येण्याची शक्यता आदल्या दिवशी दिसत असतानाही बंदोबस्त अथवा बॅरिकेडिंग काढण्यात आले नाही कारण पंधरा हजार पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत बंदोबस्त शिथिल करण्यात आल्याचा संदेश देणे सहज सोपे नव्हते तसेच राजमुंद्री शिफारशीनुसार बंदोबस्त काढणे गैर ठरले असते.
- दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी