शनैश्चर जयंतीचा अपूर्व उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:50 IST2016-06-05T00:29:40+5:302016-06-05T00:50:51+5:30

भक्तिमय वातावरण : शनी मंदिरांमध्ये भाविकांची रीघ

Unusual enthusiasm of Shaneshchir Jayanti | शनैश्चर जयंतीचा अपूर्व उत्साह

शनैश्चर जयंतीचा अपूर्व उत्साह

नाशिक : नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम। छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् ।। या शनी मंत्राच्या गजराने शहरात शनिवारी (दि.४) भक्तिमय वातावरण बघायला मिळाले. शनैश्चर जयंती तसेच शनि अमावस्येनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले होते. शनि अमावस्येला विशेष महत्त्व असल्याने शहरातील विविध शनी मंदिरांमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
रविवार पेठ, पंचवटीतील शनी चौक, भद्रकालीतील शनी मंदिर, मुंबई नाका येथील मंदिरांमध्ये भाविकांनी मनोभावे पूजा केली. शनिवारी सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांसह नवचंडिका यज्ञ, होमहवन यांसह पालखी सोहळ्याचे आयोजन शहरात करण्यात आले होते. रविवार पेठेतील शनैश्चर मंदिरातर्फे भव्य पालखी काढण्यात आली. रविवार पेठेतील शनी मंदिर, चांदीचा गणपती, टिळकपथ सिग्नल, मेहेर सिग्नल आणि अशोकस्तंभ मार्गाने काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात अनेक भाविक सहभागी झाले होते. शनैश्चर महाराजांचा चांदीचा मुखवटा असलेली पालखी आकर्षक पुष्पमालांनी सजविण्यात आली होती.
शनिवारी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होऊन रविवारी दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत अमावस्या समाप्त होणार आहे. यावर्षी शनैश्चर जयंती शनिवारी आल्याने शनिभक्तांमध्ये या दिवसानिमित्त अपूर्व उत्साह पहायला मिळाला. या दिवशी केलेली शनीची आराधना लाभदायक ठरत असल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली. शनिवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी मंदिरांमध्ये दिसून आली. यावेळी भाविकांनी मनोभावे पूजा करून देवाला तेलाचा अभिषेक, रुईच्या पानांची आणि फुलांची माळ भक्तिभावाने अर्पण केली. (प्रतिनिधी)

Web Title: Unusual enthusiasm of Shaneshchir Jayanti